पीटीआय, नवी दिल्ली

नीट पेपरफुटी, सीबीएसई परीक्षेत अनियमितता यानंतर आता ‘कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट’ (सीयूईटी-यूजी) परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने केंद्र सरकारला शनिवारी नव्या राजकीय टीकेला सामोरे जावे लागले. देशभरातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा शनिवारी काही केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने सुरू झाली, असे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने सांगितले. मात्र परीक्षेतील या गोंधळामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी केंद्र सरकारवर शरसंधान साधले.

सीयूईटी-यूजी ही परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी स्व्हिहस (टीसीएस) या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून तांत्रिक कारणामुळे परीक्षेत व्यत्यय आल्याने टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक के. कृथिवासन यांनी सांगितले. कंपनीच्या तंत्रज्ञांनी ही समस्या त्वरित ओळखली आणि तिचे निराकरण केले.

या व्यत्ययामुळे परीक्षेच्या पावित्र्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा पूर्ण भरपाई वेळेसह घेतली गेली, असे ‘एनटीए’ने सांगितले.

तांत्रिक बिघाडामुळे ही परीक्षा काही केंद्रांवर दुपारी ४.०० वाजता घेण्यात आली. सकाळच्या सत्रातील उमेदवारांना पेपरसाठी पूर्ण वेळ देण्यात आला आणि परीक्षा पूर्ण झाल्यावरच त्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली, असेही ‘एनटीए’ने निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे या निवेदनात ‘एनटीए’ने सांगितले.

सीयूईटी-यूजी ही केंद्रीय, राज्य आणि निवडक खासगी विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एनटीए’द्वारे आयोजित केली जाणारी एक प्रमाणित, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.

गोंधळांमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम, विरोधकांची टीका

सीयूईटी-यूजी परीक्षेत व्यत्यय आल्याची ‘एनटीए’ने पुष्टी केल्यानंतर काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. विश्वगुरू असल्याचा दावा करणारे एकही परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकत नाही. परीक्षांतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांना तणावाला सामोर जावे लागत आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थी, पालकांचा आरोप

’अनेक विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेतील गोंधळाबाबत तक्रार केली. आधी तारखेचा गोंधळ झाला आणि आता परीक्षा विलंबाने झाली. परीक्षा केंद्रांवर संवादाचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला.

’‘तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना ३-४ तास थांबावे लागले. कोणताही योग्य संवाद नाही, कोणतीही व्यवस्था नाही, विद्यार्थी आणि पालक प्रचंड उन्हात त्रस्त आहेत. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी हे अस्वीकार्य आहे,’ असे एका वापरकर्त्याने ‘एक्स’वर सांगितले. ’शनिवारी सकाळी १०.३० वाजता होणारी परीक्षा दिल्लीतील एका केंद्रावर संध्याकाळपर्यंतही सुरू झालेली नसल्याचे एका विद्याथ्र्याने सांगितले.