नव्या रॅन्समवेअरचा इशारा

चीनने ‘विंडोज’ संगणक वापरणाऱ्यांना नव्या रॅन्समवेअर विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. हा विषाणू मागील आठवडय़ात जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वॉनाक्राय’प्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले. ‘यूआयडब्ल्यूआयएक्स’ असे या रॅन्समवेअरचे नाव असून हा संगणकातील माहिती एनक्रिप्ट करून फाइल्सची नावे बदलतो. त्यामुळे सर्व विंडोज संगणक वापरणाऱ्यांनी आपला संगणक अदय़यावत करण्याचे आवाहन चीनच्या ‘नॅशनल कॅम्युटर वायरस इमरजन्सी रिस्पॉन्स सेंटर’ (सीव्हीईआरसी) कडून करण्यात आले आहे. अदय़ाप हा नवा रॅन्समवेअर चीनमध्ये आढळला नसून इतर देशांमध्ये तो पसरला असल्याची माहिती डेन्मार्कमधील सायबर सुरक्षा कंपनी हाईमडल सिक्युरिटीने दिली आहे. नवा रॅन्समवेअर हा मागील आठवडय़ात जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वॉनाक्राय’पेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचा इशारा हाईमडल कंपनीने दिला आहे.

क्यूहीओ ३६० या चीनमधील अग्रगण्य अॅँटिवायरस कंपनीने वॉनाक्रायमुळे चीनमधील २९,००० पेक्षा जास्त संस्थांना फटका बसल्याचे रविवारी सांगितले. सरकारी कार्यालयांपासून एटीएम आणि रुग्णालये आणि विदय़ापीठांना याची झळ पोहोचली होती, तर चीनच्या शिक्षण मंत्रालयाने चीनमधील १६०० पैकी ६६ विदय़ापीठांतील संगणकांना या रॅन्समवेअरमुळे नुकसान झाले असल्याचे सांगितले.