सोशल मीडियावरील ‘फेक’ प्रोफाईल आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा अहमदाबाद सायबर क्राईम पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. स्वतःला ‘ट्रान्सजेंडर आध्यात्मिक गुरु’ भासवून एका तरुणीला नग्न व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडणे आणि नंतर तिला ब्लॅकमेल करून १ लाख ४३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या वैयक्तिक नात्यातील समस्यांमुळे तणावात होती. यादरम्यान तिने इंस्टाग्रामवर ‘Astrologer Pooja Kinnar Maa’ नावाचे एक प्रोफाईल पाहिले. समस्या सुटेल या आशेने तिने त्या अकाउंटवर संपर्क साधला. आरोपीने तिची श्रद्धा आणि हतबलतेचा गैरफायदा घेत तिला जाळ्यात ओढले.

सुरुवातीला ‘विधी’ करण्यासाठी म्हणून आरोपीने तरुणीकडे तिचे फोटो मागवून घेतले. मात्र, काही दिवसातच या फोटोंचा वापर करून आरोपीने तिची फसवणूक सुरू केली.

ब्लॅकमेलिंगचा थरार

पोलिस तपासात समोर आले की, आरोपीने प्रथम तरुणीचे फोटो मॉर्फ केले (छेडछाड केली) आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर, ‘विधी पूर्ण करण्यासाठी’ नग्न व्हिडिओ कॉल करणे अनिवार्य असल्याचे सांगून तिला तसे करण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ कॉल गुपचूप रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या छळाला सुरुवात झाली.

पीडित तरुणीने बदनामीच्या भीतीने आतापर्यंत १.४३ लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले होते. मात्र, आरोपींच्या पैशांची भूक कमी होत नसल्याने अखेर तिने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली.

राजस्थानातून सूत्रधार अटक

अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रजनीश भार्गव (बिकानेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे अन्य दोन साथीदार विकास भार्गव आणि रवी भार्गव सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

“हे आरोपी २० ते २५ वयोगटातील असून गेल्या दोन वर्षांपासून हे रॅकेट चालवत होते. ते दररोज सुमारे ३०० लोकांशी संपर्क साधत असत,” असे पोलिसांनी सांगितले.

४० लाखांची फसवणूक

तपासात उघड झालेली काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. सुरुवातीला ३ ते १५ हजार रुपयांची मागणी केली जायची. एकदा का पीडित व्यक्ती जाळ्यात अडकली की खासगी माहिती काढून ब्लॅकमेल केले जायचे. या टोळीने आतापर्यंत शेकडो लोकांना लुटले असून सुमारे ४० ते ४२ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. हे आरोपी ज्योतिष, आध्यात्मिक गुरु आणि किन्नरांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट्स चालवत होते.

पोलिसांचे आवाहन

अनेक नागरिक केवळ समाजात बदनामी होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. “कोणाही अनोळखी व्यक्तीला आपले वैयक्तिक फोटो पाठवू नका किंवा आध्यात्मिक उपायांच्या नावाखाली व्हिडिओ कॉल करू नका,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारचा संशयास्पद अनुभव आल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.