नवी दिल्ली : बँकांनी योग्य खबरदारी न घेतल्यामुळे डिजिटल अटक घोटाळ्यातील पीडितांचे नुकसान झाल्याचे तपासात सिद्ध झाले तर त्यासाठी बँकांना जबाबदार ठरवून पीडितांना किमान नुकसान झालेली रक्कम भरपाई म्हणून मिळाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) प्रस्तावित नियामक चौकटीमध्ये नुकसानभरपाई, प्रतिबंधात्मक हस्तक्षेप आणि संस्थेचे उत्तरदायित्व यांची अंमलबजावणी करता येईल अशा तरतुदींचा समावेश असावा, अशी सूचना सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केली.
डिजिटल अटक आणि वित्तीय सायबर घोटाळ्यांची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली. ‘आरबीआय’ची नियामक प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी देण्यापूर्वी खंडपीठ त्यांच्या प्रस्तावित ‘केवायसी सुधारणा निर्देश, २०२६’ची तपासणी करेल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. याची अधिसूचना ३० नोव्हेंबरपर्यंत काढली जाण्याची शक्यता असून अंमलबजावणी ३१ डिसेंबरपासून करण्याचा प्रस्ताव आहे.
या नियामक चौकटीत सामान्य सल्ल्यांच्या पलीकडे मुद्दे असावेत, नियमांचे अनुपालन न केल्यास होणार्या परिणामांसह वित्तीय संस्थांवरील जबाबदार्या स्पष्टपणे प्रस्थापित केल्या जाव्यात, यावर खंडपीठाने भर दिला.
‘सुशिक्षित नागरिक डिजिटल अटकेचे बळी कसे?’
* डिजिटल अटकेच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना, जनजागृती मोहिमा, वृत्तमाध्यमांतील बातम्या आणि न्यायालयाचे आदेश असूनही सुशिक्षित नागरिक या फसवणुकीला बळी कसे पडतात, याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.
* यावेळी न्या. कांत यांनी, ‘‘या पीडितांचे नेमके चुकते तरी काय? ते अशा जाळ्यात कसे अडकतात? मोबाइलवर अटक होऊ शकते, या भीतीचे कारण काय? मोबाइल भिंतीवर आपटला, तर अटक संपेल,’’ अशी मौखिक टिप्पणी केली.
* या प्रकरणात ‘न्यायमित्र’ म्हणून काम पाहणार्या ज्येष्ठ वकील एन. एस. नप्पिनई यांनी सांगितले की, अशा घटना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असले, तरी ही समस्या कायम आहे. गेल्याच आठवड्यात एका महिलेला अडीच कोटी रुपये गमवावे लागल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुशिक्षित लोकांचीही फसवणूक होत असल्याचे पाहून आम्हाला निराशा वाटते. या वयात डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करून घेणारे लोक पुढच्या पिढीस काय शिकवणार? न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाऊन संबंधित आदेश अस्तित्वात आहे की नाही, हे तपासता येते. – न्या. सूर्य कांत, सरन्यायाधीश
