ओडिशा, आंध्र प्रदेशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका ; किनारपट्टी भागांत मुसळधार पाऊस

अंदमान समुद्रात ३० नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी चक्रीवादळीय स्थिती निर्माण झाली.

जवाद चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठय़ा लाटा आदळत आहेत.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळाला ‘जवाद’ असे नाव देण्यात आले असून आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीवर आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

अंदमान समुद्रात ३० नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी चक्रीवादळीय स्थिती निर्माण झाली. शुक्रवारी या स्थितीचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून शनिवारी सकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी वर्तवली आहे.

आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टी भागांत या चक्रीवादळामुळे शुक्रवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारीही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम आणि विशाखापट्टणम आणि ओडिशातील गजपती, गंजम, पुरी आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका असल्याने तटरक्षक दलाने सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर शुक्रवारी रात्री ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग शनिवारी संध्याकाळी ताशी १०० किलोमीटर असेल आणि सगल १२ तास वाऱ्याचा वेग कायम असणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

या चक्रीवादळाला जवाद हे नाव सौदी अरेबियाने दिलेले आहे.

अन्य राज्यांमध्येही मुसळधार पाऊस

जवाद चक्रीवादळामुळे देशातील अन्य राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्येही रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवार ते रविवार मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरातील खोल समुद्रात मासेमारी बोटी नेऊ नयेत, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyclone jawad set to impact andhra pradesh odisha zws

Next Story
विरोधकांच्या बेकीमुळे दबावाचे प्रयत्न फोल ; निलंबित खासदारांविना राज्यसभेचे कामकाज सुरळीत; चर्चेत काँग्रेस सदस्यांचाही सहभाग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी