बंगालच्या उपसागरात अवघ्या आठवडाभराच्या अंतराने दुसरे चक्रीवादळ तयार झाले असून, ‘मुरासु’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. हे चक्रीवादळ ३ नोव्हेंबर रोजी सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, तर वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नुकतेच ‘अर्णब’ चक्रीवादळ धडकून गेलेल्या भागांना पुन्हा एकदा वादळी पावसाचा सामना करावा लागू शकतो.

नव्या चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. गेल्या २६ ऑक्टोबरला तयार झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली होती. त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशासह देशाच्या अनेक भागांत पाऊस झाला. ओडिशातील गंजम आणि गजपती जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून पूरसदृश परिस्थिती असून, अर्णबमुळे झालेल्या नुकसानीतून राज्य अद्याप सावरलेले नाही. अशातच नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने सखल तसेच डोंगराळ भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.

दक्षिण भारताला सतर्कतेचा इशारा

२ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायलसीमा विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुदुचेरी, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ भागात मुसळधार पाऊस

३ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ओडिशामध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहण्याची शक्यता आहे. या भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुदुचेरी, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अर्णब चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पूर्व किनारपट्टीसमोर आठवडाभरातच दुसऱ्या वादळाचे आव्हान उभे राहिले आहे.

चक्रीवादळाचा वेग अधिक

भारतीय हवामान खात्याने महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर राहण्याची शक्यता असून, वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना कडक इशारा दिला असून, त्यांना किमान बुधवार, ४ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे आणि जे सध्या समुद्रात आहेत त्यांना तात्काळ बंदरात परत येण्याचे आवाहन केले आहे.

‘मुरासु’ हे नाव कशावरून

प्रादेशिक चक्रीवादळांच्या नामकरण यादीसाठी ‘मुरसू’ हे नाव भारताने सुचवले आहे. तमिळ भाषेतून आलेला ‘मुरसू’ हा शब्द एका पारंपरिक तालवाद्याला आणि प्राचीन काळी, या ढोलाने एक महत्त्वाची सामाजिक भूमिका बजावली, ज्याचा उपयोग विशेषतः गावोगावी आणि राज्यांमध्ये सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रसारित करण्यासाठी केला जात असे.