Cyclone Murasu Landfall: अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात पाच जणांचा जीव घेतल्यानंतर आता तिथे मुरसू चक्रीवादळ धडकलं आहे. मध्यरात्री १ च्या सुमारास मुरसू चक्रीवादळ ओंगोलजवळील कोथपट्टणम येथे धडकलं. या वादळामुळे १५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, यामुळे महाराष्ट्राच्या हवामानातही बदल झाला असून काहीठिकाणी तापमान वाढलं आहे. तर, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या.

झाडे उन्मळून पडली, सखल भागात पाणी

या चक्रीवादळामुळे नेल्लोर, प्रकाशम आणि बापटला जिल्ह्यांत शेकडो झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब या वादळात टिकून राहिल्याने वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पहाटे ३.३० वाजता जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत टेलिकॉन्फरन्सद्वारे ‘मुरसू’ चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. ‘मुरसू’ चक्रीवादळ सकाळी ६.३० वाजेपर्यंत किनारपट्टी ओलांडून पुढे जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी आलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर तुटलेल्या जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने किमान ५ लोकांचा मृत्यू झाला होता; अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सर्व अडथळे दूर होईपर्यंत लोकांनी चक्रीवादळग्रस्त भागातील रस्त्यांवर बाहेर पडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, वादळामुळे अद्याप एकही विजेचा खांब पडलेला नसून, बाधित भागातील वीज पुरवठा कुठेही खंडित झालेला नाही, अशी माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुढील १२ तास महत्त्वाचे

हवामान विभागाने पुढील १२ तासांत दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने खगोलीय भरतीपेक्षा १ ते १.५ मीटर उंच लाटा उसळण्याचा इशाराही दिला आहे, यामुळे बुधवार सकाळपर्यंत किनारपट्टीच्या सखल भागात पाणी साचू शकते. बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांना या लाटांचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. ‘मुरसू’ चक्रीवादळाचा परिणाम शेजारील क्षेत्रांवरही दिसून येत आहे. पुद्दुचेरीमध्ये मध्यरात्रीपासून सतत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या चक्रीवादळाच्या बाहेरील पावसाच्या पट्ट्यांचा सध्या उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक भागात पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता की, ओंगोलजवळील नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्यापूर्वी ‘मुरसू’ चक्रीवादळ एका अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल.