यास चक्रीवादळाचं रौद्ररुप; ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस

सकाळी १०च्या सुमारास वादळ धडकण्याची शक्यता

फोटो सौजन्य – ANI

यास हे तीव्र चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने आगेकूच करीत असून ते बुधवारी सकाळी भद्रक जिल्ह्य़ात धामरा बंदरावर भूस्पर्श करील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. सकाळी १०च्या सुमारास हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वादळाआधी ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

हवामान विभागाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार हे वादळ ओडिशापासून धामरा बंदरावर ४० किमी अंतरापासून आणि बालासोरपासून दक्षिण पूर्व भागात ९० किमी अंतरावर होते. दुपारी २ च्या नंतर हे चक्रीवादळ ओडिशापासून पुढे जाणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या दरम्यान हवेचा वेग हा १३० ते १४० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळापासून वाचण्यासाठी ओडिशातील ९ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. हे ९ जिल्हे करोनामुळे रेड झोन मध्ये असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १००० सक्रिय रुग्ण आहेत.

उत्तर – पश्चिम आणि बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाने भीषण रुप धारण केल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. भुवनेश्वरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातील वैश्वानिक डॉ. उमाशंकर दास यांनी सांगितले की, वादळाचा भूस्पर्श धामरा व चांदबाली जिल्ह्य़ांच्या दरम्यान होईल. तर भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यास चक्रीवादळ आणखी तीव्र झाले असून मंगळवारी सायंकाळी त्याचा जोर वाढला आहे. चांदबली येथे जास्त प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काही ठिकाणी वादळामुळे पावसाला सुरुवात झाली असून केंद्रपारा व जगतसिंगपूर जिल्ह्य़ात मध्यरात्रीपासून ताशी ८० कि.मी वेगाने वारे वाहू लागले आहेत. वादळाने भूस्पर्श केल्यानंतर त्याचा तीव्र परिणाम सहा तास दिसणार आहे. मोठी झाडे व विजेचे खांब कोसळण्याच्या घटना चांदबली येथे घडू शकतात.

मुकाबल्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक पथके

ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक मदत पथके तैनात करण्यात येत आहेत. वादळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एकूण ११२ पथके पाच राज्ये व अंदमान निकोबार बेटांवर तैनात करण्यात येणार आहेत.  ओडिशात ५२ पथके तैनात केली जाणार असून ४५ पश्चिम बंगालमध्ये तैनात केली जातील. काही पथके आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, अंदमान निकोबार येथे तैनात करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांसाठी सर्वाधिक पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी पन्नास पथके राखीव ठेवण्यात येणार आहेत.  या राज्यांमध्ये आधीही वादळे झाली आहेत पण ती आताच्या वादळाइतकी तीव्र नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cyclone yaas weather today west bengal odisha and other states abn

ताज्या बातम्या