टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाने आणखी एक धक्का दिला आहे. टाटा समूहातील ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ या टेलिकॉम कंपनीच्या संचालकपदावरूनही आज त्यांना हटवण्यात आले आहे. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
मिस्त्री यांना मंगळवारी टाटा समूहातील टीसीएसच्या संचालकपदावरून पायउतार करण्यात आले होते. मुंबईत मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या सभेत मिस्त्री यांनी स्वतःहून पद सोडायला हवे होते, अशी भावना भागधारकांनी व्यक्त केली होती. टाटा समूहातील टीसीएसच्या संचालकपदावरून दूर करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला भागधारकांची मंजुरी मिळविण्यासाठी मंगळवारी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी ३.३० वाजता सभा झाली होती. मिस्त्री यांना हटवण्यासाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यानंतर त्यांना संचालकपदावरून हटवण्यासंबंधी चर्चा झाली. दरम्यान, मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मिस्त्री यांनी भागधारकांना लिहिलेले पत्र टीसीएसच्या कंपनी सचिवांनी वाचून दाखविले होते. बहुसंख्य भागधारकांनी या सभेत आपले मत व्यक्त करताना रतन टाटा यांना पाठिंबा व्यक्त केला होता.




टाटा समूहाची, तिच्या अनेक कंपन्यांची विश्वासाची परंपरा आजही कायम असून त्याला बाधा पोहोचेल, असे कार्य कुणाच्याही हातून घडणे हे गैर असल्याचे सभेस सांगण्यात आले. टाटा कंपन्यांमधील अंतर्गत वाद भागधारकांपर्यंत येण्याची गरज नव्हती; त्यासाठी कंपनी संचालक मंडळ स्तरावर निर्णय घेणे अपेक्षित होते, असे मत एका भागधारकाने सभेनंतर व्यक्त केले होते.
या बैठकीपूर्वी मिस्त्री यांनी टीसीएसच्या भागधारकांना पत्र लिहून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. टीसीएसचे भविष्य सुशासन आणि नैतिक व्यवहारावर टिकलेले आहे. गेल्या काही आठवड्यात मंडळ आणि व्यवस्थापनाने सुशासनाचा बोजवारा उडवलेला आहे. त्यामुळे यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही पुढे या, असे मिस्त्री म्हणाले होते. त्यापूर्वी सोमवारीही मिस्त्री यांची टाटा इंडस्ट्रिजच्या संचालकपदावरून हकालपट्टी केली होती.