एसआरएल डायग्नॉस्टिकची पाहणी
मानवी शरीरासाठी ‘ड’ जीवनसत्त्व खूपच महत्त्वाचे आहे. हाडांना बळकटी येण्यासाठी हे जीवनसत्त्व आवश्यक असते. मात्र भारतामधील शहरी भागात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे त्यांच्यात हाडांचा ठिसूळपणा वाढला आहे, असे ‘एसआरएल डायग्नॉस्टिक’ या संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा निर्माण होतो. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर त्याचे प्रमाण जास्त असते, त्याचा पुरूषांमध्येही परिणाम दिसून येतो असे ‘एसआरएल डायग्नॉस्टिक’ने म्हटले आहे.
गेल्या तीन वर्षांत (२०१२-२०१४) ७३ लाख लोकांची तपासणी केली असता त्यात ८०.६३ टक्के पुरूषांमध्ये ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी दिसून आले. पूर्व भारतात ‘ड’ जीवनसत्त्व कमी असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून ते ८६.६ टक्के आहे. उत्तर व दक्षिण भारतात हे प्रमाण अनुक्रमे ८१.३ टक्के व ८५.६ टक्के आहे.
पश्चिम भारतात ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असलेल्या लोकांचे प्रमाण ६९.८ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा ही एक लक्षण अवस्था असून त्यात हाडे ठिसूळ बनतात. हा रोग हृदयविकारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार भारतात तीन महिलांमध्ये एका महिलेत तर आठ पुरूषांपैकी एका पुरूषात ऑस्टिओपोरोसिस दिसून येतो. कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा शरीराला झाला तर हाडांची घनता मजबुती वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसला आळा बसतो.
फॉर्टिस एसआरएल लॅबच्या संचालक डॉ. लीना चटर्जी यांनी म्हटले आहे की, महिलाच नव्हे, तर पुरूषांमध्येही हाडांचा ठिसूळपणा तेवढय़ाच प्रमाणात असतो, कारण त्यांच्यात ‘ड’ जीवनसत्त्व कमी असते. जे लोक घरात राहतात व सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांच्यात हे जीवनसत्त्व कमी असते, वेळीच निदान झाले तर ऑस्टिओअ‍ॅपनिया, ऑस्टिोपोरोसिस व ऑस्टिओमॅलॅसिया हे हाडांच्या ठिसूळपणाचे प्रकार टाळता येतात. ऑस्टिओमॅलॅसियामध्ये हाडात वेदना होतात, त्यात अनेकदा फायब्रोमायग्लिया असल्याचे चुकीचे निदान केले जाते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावे स्नायू कमकुवत होतात, हाडे तुटण्याचे प्रमाण वाढते.

* भारतातील शहरी भागात ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जास्त.
* पूर्व भारतात सर्वाधिक नागरिकांमध्ये ’ड’ जीवनसत्त्वाचा अभाव
* पश्चिम भागात कमी लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव
* हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक
* ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे ठिसूळ होतात.
* आठ पैकी एका पुरूषाला तर तीनपैकी एका महिलेला भारतात ऑस्टिओपोरोसिस.
* सूर्यप्रकाशात त्वचेखाली ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती