कोकण रेल्वेवर आता ‘तुतारी’ धावणार; दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलले

केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेवरुन ट्रेनचे नामकरण

indian railways taking help from apple to increase train speed
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोकणात धावणाऱ्या दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलण्यात आले आहे. दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले आहे. दादरमध्ये झालेल्या रेल्वेच्या कार्यक्रमात दादर-सावंतवाडी-दादर ट्रेनचे नाव बदलण्यात येणार आहे. येत्या सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून दादर-सावंतवाडी-दादर ट्रेनचे ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात येईल.

दादर-सावंतवाडी मार्गावर १ जुलै २०११ रोजी राज्यरानी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. त्यामुळे एका रात्रीत प्रवास करता येणे शक्य झाले. त्यामुळे प्रवाशांनी या ट्रेनला पसंती दिली. कोकणवासियांमध्ये दादर-सावंतवाडी ट्रेन अतिशय लोकप्रिय आहे.

केशवसुत नावाने सुप्रसिद्ध असलेले मराठी कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या सन्मानार्थ दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलण्यात आले आहे. केशवसुत यांची ‘तुतारी’ ही कविता लोकप्रिय आहे. त्यावरुनच दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून ‘तुतारी एक्स्प्रेस’ असं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना केशवसुत यांनी ‘तुतारी’ कवितेची रचना केली. या कवितेतून केशवसुतांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्याचे आणि पेटून उठण्याचे आवाहन केले. केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेने अनेकांना ब्रिटिशांविरोधात लढण्याची प्रेरणा दिली. केशवसुतांचा जन्म कोकणातील रत्नागिरीमधील गणपतीपुळ्याजवळ झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dadar sawantwadi train to be renamed tutari express after famous marathi poem of keshavsut