दादरी येथे गोमांस सेवन केल्याच्या संशयावरून मोहमंद अखलाख यांची हत्या करणाऱ्या जमावामधील बहुतांशजण भाजपशी संबंधित असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १० पैकी सातजण उत्तर प्रदेशातील भाजपचे कार्यकर्ते संजय राणा यांचे नातेवाईक आहेत. यामध्ये संजय राणा यांचा मुलगा विशालचाही समावेश आहे. दादरीतील बिसरा गावात राहणारे हे १० आरोपी १८ ते २४ वयोगटातील असून त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. संजय राणा यांनीदेखील आरोपींपैकी विशाल, सौरभ, गौरव, संदीप, शिवम, सचिन आणि विवेक आपल्या कुटुंबातील असल्याचे मान्य केले आहे. तर रुपेंद्र, हरी ओम आणि श्री ओम हे तीनजण आपले शेजारी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बिसरा गावचे सरपंच संजीव राणा यांनीदेखील हे १० हल्लेखोर ठाकूर समाजातील असून ते एकमेकांच्या आजुबाजूलाच राहत असल्याचे सांगितले. गावात यापूर्वी अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नव्हती. त्यामुळे हा सगळा प्रकार आमच्यासाठीही धक्कादायक असल्याचे संजीव राणा यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadri lynching eight of 11 named in fir detained are relatives of bjp worker
First published on: 05-10-2015 at 11:51 IST