करोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात गेल्या २४ तासांत करोनाचे १९ हजार ५५६ रुग्ण आढळले आहेत. सहा महिन्यात पहिल्यांदाच भारतात २० हजाराहून कमी रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात सध्याच्या घडीला १ कोटी ७५ लाख ११६ करोना रुग्ण आहेत. तसंच गेल्या २४ तासात ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजारावर पोहोचली आहे.

सोमवारी देशात २४ तासांत २४ हजार ३३७ जणांना करोनाची लागण झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ५५ हजार ५६० वर पोहोचली होती. करोनातून बरं होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्क्यांवर पोहोचले आहे. करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के इतकं आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सलग १५व्या दिवशी चार लाखांहून कमी होती. देशात सध्या तीन लाख तीन हजार ६३९ उपचाराधीन रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण संख्येच्या ३.०२ टक्के इतके आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने १९ डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला होता.

दरम्यान सध्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा प्रकार आढळल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये नवा प्रकार आढळल्याने फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत. जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे. सध्या तरी ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या लोकांची कठोर तपासणी सुरू असून आरटी पीसीआर चाचण्या सक्तीच्या आहेत.

‘विषाणू घातक नाही’
ब्रिटनमध्ये सापडलेला करोनाचा नवा जास्त संसर्गजन्य विषाणू घातक असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत असं अमेरिकेतील भारतीय वंशाचे महाशल्यचिकित्सक विवेक मूर्ती यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, “करोनावर आता लशी उपलब्ध आहेत. त्या लशी नवीन प्रकारच्या विषाणूवर परिणामकारक ठरणार नाहीत असं मानण्याचं कुठलंही कारण नाही. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार सापडला असून तो जास्त संसर्गजन्य आहे असं सांगण्यात आलं असलं तरी विषाणूचा हा प्रकार सर्वात घातक असल्याचे पुरावे नाहीत”. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की “मुखपट्टी लावणे व सामाजिक अंतर पाळणे हेच दोन उपाय त्यावर आहेत, त्यातून या विषाणूचा प्रसार रोखला जाईल”. नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी याच महिन्यात महाशल्यचिकित्सक पदी मूर्ती यांची नियुक्ती जाहीर केली आहे.