कॉर्पोरेट जगतात वाढता ताण, कामाचे डेडलाईन्स आणि सततची धावपळ हे समीकरण आता नवीन राहिले नाही. मात्र, या गराड्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि टीममधील जिव्हाळा जपण्यासाठी एका भारतीय महिला उद्योजिकेने घेतलेल्या पुढाकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘केके क्रिएट’ (KK Create) या स्टार्टअपच्या संस्थापिका काव्या कर्नाटक यांनी आपल्या कार्यालयात ‘डेली पिकनिक’ची एक नवी परंपरा सुरू केली आहे.
दुपारी २ वाजता काम पूर्णपणे बंद
काव्या कर्नाटक यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टद्वारे या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या ऑफिसमध्ये ४० कर्मचाऱ्यांची टीम आहे. दररोज दुपारी २ वाजले की, ऑफिसमधील सर्व कामे पूर्णपणे थांबवली जातात. मग तो कोणताही महत्त्वाचा प्रोजेक्ट असो किंवा डेडलाईन असो. २ वाजता सर्वांना एकत्र येणे अनिवार्य आहे. या एका तासाला त्यांनी ‘ऑफिस पिकनिक’ असे नाव दिले आहे.
कसा असतो हा ‘पिकनिक’चा तास?
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कार्यालयातील कोणतीही अधिकृत शिस्त किंवा पदे आड येत नाहीत. काव्या सांगतात, मॅनेजरपासून ते अगदी नवीन जॉईन झालेल्या इंटर्नपर्यंत सर्वजण एकत्र बसतात. कर्मचारी एकमेकांचा घरचा डबा शेअर करतात. या काळात ऑफिसच्या कामावर चर्चा न करता जोक्स, मजेशीर किस्से आणि काही वेळा ‘माफिया’सारखे खेळही खेळले जातात. खुर्च्या ओढून, दाटीवाटीने बसून सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे जेवण करतात. यामुळे कोणालाही एकटे वाटत नाही.
संस्कृती आणि विश्वासाचे नाते
काव्या कर्नाटक यांच्या मते, ही केवळ जेवणाची सुट्टी नसून टीमला जोडणारा दुवा आहे. “काही दिवसांनी हे ऑफिस वाटतच नाही, तर एक कुटुंब वाटते. हे ६० मिनिटे मला जाणीव करून देतात की, कामाच्या पलीकडे असलेले नातेच खऱ्या अर्थाने एक मजबूत टीम तयार करते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
काव्या यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, “जेव्हा लोक एकमेकांसोबत हसतात आणि जेवण शेअर करतात, तेव्हा काम ओझे वाटत नाही.” तर दुसऱ्या एका युजरने याला ‘ट्रस्ट बिल्डिंग’ (विश्वास वाढवणारा) उपक्रम म्हटले आहे.
मात्र, काही जणांनी यावर वेगळा दृष्टिकोनही मांडला. काहींच्या मते, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. कोणाला शांततेत ब्रेक हवा असतो, तर कोणासाठी तो वेळ कामाचा महत्त्वाचा टप्पा असू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी ऐच्छिक असाव्यात, असेही काहींनी सुचवले आहे. कामाच्या ठिकाणी केवळ नफा आणि उत्पादकता न पाहता, कर्मचाऱ्यांमधील मानवी नाते जपण्याचा काव्या यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. ‘वर्क कल्चर’ सुधारण्यासाठी असे छोटे पण प्रभावी बदल भविष्यात इतर कंपन्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतात.
