गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या वाद-विवादानंतर अखेर दलित नवरदेवाची घोड्यावर बसून लग्न मंडपापर्यंत पोहोचण्याची इच्छा पूर्ण झाली. रविवारी आग्रा येथील कासगंज येथे दलित-ठाकूर यांच्यातील वाद शमल्यानंतर थाटामाटात विवाहसोहळा संपन्न पार पडला. दलित नवरदेवाची घोड्यावर बसून लग्नमंडपापर्यंत जाण्याची इच्छा होती, मात्र गावातील ठाकूर समाजाला हे मंजूर नव्हतं. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेला या वादातून अखेर मार्ग काढण्यात आला आणि चुकीच्या पंरपरेला फाटा देत विवाहसोहळा पार पाडण्यात आला.

अशाप्रकारे कासगंज जिल्ह्यातील निजामपूर गावात रविवारी पहिल्यांदाच एका दलित नवरदेवाने संपूर्ण गावात फिरत विधी पूर्ण केले. जानेवारी महिन्यात निजामपूर गावातील शितलचं लग्न सिकंदराराऊ गावातील संजय जाटव याच्यासोबत ठरलं होतं. हे लग्न ठरल्यापासूनच गावात वाद आणि तणाव निर्माण झाला होता. यामागचं कारण होतं संजयने व्यक्त केलेली इच्छा. घोड्यावर बसून संपुर्ण गावभर आपली वरात निघावी अशी संजयची इच्छा होती.

संजयने व्यक्त केलेल्या इच्छेला ठाकूर समाजाचा विरोध होता. ही गावातील परंपरा नसून, विनाकारण हट्ट करत गावाची परंपरा तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते म्हणत होते.

हे लग्न निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी कऱण्यात आली होती. वरातीसाठी मार्ग निवडण्यात आला होता. वरात ज्या रस्त्याने जाणार होती तेथील घराच्या छतांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील एकूण ३५० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते. एडीएम, एएसपीसहित सर्व अधिकारी लग्न संपन्न होईपर्यंत उपस्थित होते. पोलिसांनी काही विघ्न येऊ नये यासाठी आधीच ३७ जणांवर कारवाई केली होती.

छावणीचं स्वरुप आलेल्या गावात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात लग्नात सहभाग घेतला. संपूर्ण गावभर बँड बाजासोबत वरात काढण्यात आली. अगदी थाटामाटात लग्न पार पडलं. गेल्या सहा महिन्यांपासून गावकरी वाट पाहत होते ते लग्न अखेर पार पडत होतं.