राजस्थानमधील जोधपूरमध्ये रविवारी एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रियकराच्या डोळ्यादेखत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपींनी पीडितेच्या प्रियकराला दमदाटी करून हे कृत्य केलं आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी अमृता दुहान यांनी सांगितलं की, पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर शनिवारी अजमेरहून पळून जोधपूरला आले होते. रात्री साडे दहाच्या सुमारास ते बसने जोधपूरला पोहोचले. यानंतर ते राहण्यासाठी खोली शोधण्यासाठी एका गेस्ट हाऊसला गेले. परंतु तेथील केअरटेकरने मुलीशी गैरवर्तन केल्याने ते दोघं तिथून निघून आले.
दरम्यान, हे जोडपं गेस्ट हाऊसच्या बाहेर उभं असताना समंदर सिंग, धरमपाल सिंग आणि भटम सिंग हे तीन आरोपी त्यांच्याजवळ आले. तिघांनी या जोडप्याला जेवण देऊन मैत्री केली. त्यानंतर रविवारी पहाटे ४ वाजता आरोपींनी दोघांना रेल्वे स्थानकावर नेतो असे सांगून जेएनव्हीयूच्या जुन्या कॅम्पसमधील हॉकी मैदानावर आणलं.
हेही वाचा- “…अन् दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला”, आरोपी राहुलने कबुलीजबाबात सांगितला भयावह घटनाक्रम!
या मैदानावर पोहोचल्यानंतर, तीन आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित मुलीच्या प्रियकराला मारहाण केली. प्रियकराशी दमदाटी करत आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, या मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी काही लोक येत असल्याचं पाहून आरोपी विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पीडित मुलीच्या प्रियकराने मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर तीन तासांच्या आत पोलिसांनी श्वान पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिन्ही आरोपींना एकाच घरातून अटक केली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन आरोपींच्या पायाला आणि एका आरोपीच्या हाताला दुखापत झाली, असंही पोलीस अधिकारी दुहान यांनी सांगितलं. पोलीसांनी जोधपूर येथील गेस्ट हाऊसच्या केअरटेकरलाही अटक केली आहे.
‘एनडीटीव्ही’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी विद्यार्थी भाजपाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. ते जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात (जेएनव्हीयू) एबीव्हीपीकडून उमेदवारी मिळालेल्या एका विद्यार्थी नेत्याचा प्रचार करत होते. पण अभाविपने या तिघांशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.