रक्षाबंधनाबद्दलचा ‘तो’ वादग्रस्त आदेश अखेर प्रशासनाकडून रद्द

प्रशासनाचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

rakshabandhan
प्रातिनिधीक छायाचित्र

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दमण आणि दिव प्रशासनाकडून देण्यात आलेला वादग्रस्त आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या दमण आणि दिवमधील सरकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी उपसचिव यांच्या स्वाक्षरीने परिपत्रकदेखील काढण्यात आले होते. रक्षाबंधनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील पुरुष सहकाऱ्यांना राखी बांधावी, असे आदेश परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले होते. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात सोमवारी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कार्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा, असे आदेश दिव दमण प्रशासनाच्या उपसचिवांनी दिले होते. यासाठी उपसचिव गुरुप्रीत सिंग यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक जारी केले होते. ‘सोमवारी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांना राखी बांधावी,’ असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. हा आदेश दिव दमणमधील सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे ७ ऑगस्टमधील कार्यालयीन उपस्थिती दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ ऑगस्टला तपासण्यात येईल, असाही उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला होता. मात्र या आदेशावर जोरदार टीका झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्यात आला.

सर्वांनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करावा, यासाठी प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र यामुळे एकाच कार्यालयात काम करणाऱ्या प्रेमी युगुलांची गोची झाली होती. मात्र या आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daman and diu government department takes back its controversial orders regarding rakshabandhan