Thar-Fortuner Viral Video : सध्या अपघाताच्या घटनांचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. दररोज अपघाताच्या अनेक घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात. त्यामुळे गाडी चालवताना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता गरजेची असते. मात्र, सुरक्षिततेच्या सूचना देऊनही लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि जीव धोक्यात घालतात. अनेकदा असंही पाहायला मिळतं की काहीजण आपला रुबाब दाखवण्यासाठी बेदरकारपणे गाडी चालवतात. मात्र, असे प्रकार होऊ नये म्हणून दमण जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबवण्यात आलेल्या ‘रफ्तार नहीं, संस्कार’ या उपक्रमाची मोठी चर्चा देशभरात सुरू आहे.
दमण जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा प्रशासन आणि आरटीओ विभागाच्या ‘रफ्तार नहीं, संस्कार’ हे रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आलं. या उपक्रमामध्ये दमणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थार आणि फॉर्च्युनरच्या मालकांना एकत्रित करत वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याची आणि रस्त्यावर भाईगिरी किंवा हिरोगिरी न करण्याची शपथ दिली आहे. यामध्ये शेकडो थार आणि फॉर्च्युनर गाड्या एका रांगेत उभ्या करण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या मालकांनाही रांगेत उभं करून त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याची शपथ देण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
दमण जिल्हा प्रशासनाने महिंद्रा थार आणि फॉर्च्युनर या सारख्या एसयूव्ही गाड्यांच्या मालकांकडून सुरक्षित वाहन चालवण्याची शपथ घेतली आहे. बुधवारी (९ सप्टेंबर) संध्याकाळी आयोजित रस्ते सुरक्षा मोहिमेदरम्यान दमणचे जिल्हाधिकारी सौरभ मिश्रा यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली.’थार ही गाडी भाईगिरी किंवा गुंडगिरी करण्यासाठी नाही. ती एक जबाबदारी आहे. तुम्ही रस्ते अपघातातील पीडितांना मदत केली पाहिजे. सौरभ मिश्रा यांनी थार गाड्यांच्या मालकांना हा संदेश सोशल मीडियावर शेअर करण्याचं आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना ‘टॅग’ करण्याचं आवाहन केलं.
“अशा उपक्रमामागचा उद्देश हा आहे की, थार कंपनीच्या मालकाने आपल्या गाडीबाबत देशभरात अशा प्रकारची मोहीम राबवावी”, असं मिश्रा यांनी म्हटलं. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाने थार आणि फॉर्च्युनर गाड्यांचे मालक रस्ते सुरक्षेची शपथ घेत असल्याचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) पोस्ट केला आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे?
दमणमधील एका मैदानात शेकडो थार आणि फॉर्च्युनर गाड्या एका रांगेत उभ्या करण्यात आल्याचं दिसत आहे. तसेच या गाड्यांच्या मालकांना गाड्यांसमोर रांगेत उभं करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी मिश्रा आणि अनेक पोलीस अधिकारी व आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मालक आणि चालकांना रस्ते सुरक्षेचे संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन मैदानाभोवती आणि वाहनांभोवती फेऱ्या मारायला लावण्यात आल्या.
Thar and Fortuner owners participating in the ‘Thar-Fortuner Sankalp Yatra’ and taking the Road Safety Pledge administered by District Collector. @anandmahindra #daman #damanpublicity #thar #fortuner #TharKaMatlabZimmedari #awareness pic.twitter.com/K62cTnQDDm
— Department of Information & Publicity (@DamanPublicity) September 9, 2026
काय शपथ दिली?
“मी अतिवेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन न चालवण्याची शपथ घेतो. मी रस्त्यावर स्टंट, रेसिंग किंवा ड्रिफ्टिंग करणार नाही आणि इतरांनाही तसं करू देणार नाही. मी मद्यपान करून वाहन चालवणार नाही”, अशी शपथ यावेळी या वाहन चालकांना देण्यात आली. तसेच कोणत्याही गाडीच्या मालकांनी किंवा चालकांनी आपल्या वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करण्याची शपथही यावेळी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मिश्रा काय म्हणाले?
“मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही सोशल मीडियाद्वारे आनंद महिंद्रा यांना टॅग करा, जेणेकरून आम्ही येथे राबवत असलेल्या या मोहिमेबद्दल त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या कार्यालयातील लोकांना माहिती मिळेल. आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनाही (महिंद्रा यांना) प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही अशा प्रकारची एखादी मोहीम राबवावी. जर एखादा अपघात झाला, तर तिथून जाणारी ‘थार’ किंवा ‘फॉर्च्युनर’ गाडी जखमी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाईल. अशा मोहिमेद्वारे थार गाडीची भाईगिरी किंवा माफियागिरीशी जोडली गेलेली प्रतिमा बदलता येईल”, असं जिल्हाधिकारी मिश्रा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दमण जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या ‘संकल्प यात्रा’ कार्यक्रमासाठी दमण आरटीओकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व थार आणि फॉर्च्युनर गाड्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बदललेले टायर्स किंवा बदललेली साऊंड सिस्टिम या सारख्या अनधिकृत गोष्टी काढून टाकण्यास सांगण्यात आले. भाईगिरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,असा संदेशही देण्यात आला.
