Zaira Wasim On Nitish Kumar Viral Video : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये नितीश कुमार हे एका बुरखाधारी महिलेच्या चेहऱ्यावरील बुरखा स्वत:च्या हाताने खाली सरकवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं जातं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नितीश कुमार यांनी महिलेचा हिजाब दूर करण्याचा प्रयत्न केल्याच्या या प्रकरणावर आता दंगल फेम झायरा वासिमने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी झायरा वासिमने केली आहे. या संदर्भात तिने एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे.
झायरा वासिमने काय म्हटलं?
झायरा वसीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये म्हटलं की, “महिलांच्या प्रतिष्ठेशी आणि आदराशी तडजोड केली जाऊ शकत नाही. विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच, एक मुस्लिम महिला म्हणून. एखाद्या मुस्लिम महिलेचा बुरखा इतक्या सहजतेनं ओढणं आणि त्याचबरोबर बेफिकीरपणे हास्य करणं आणि पाहणं हे अत्यंत संतापजनक आहे. सत्ता ही सीमा ओलांडण्याची परवानगी देत नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी”, असं झायरा वासिमने म्हटलं आहे.
‘राजद’कडून व्हिडीओ शेअर
लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने नितीश कुमार यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसत आहेत. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडीओवरुन संताप व्यक्त केला आहे.
एजाज अहमद यांनी काय म्हटलं आहे?
राजदचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी फेसबुक पोस्ट करत नितीश कुमार यांच्या मानसिक अवस्थेबाबत टीका केली. महिलांचा सन्मान करणं नितीश कुमार यांना जमत नाही, असंही अहमद यांनी म्हटलं आहे.
