आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडण्याचा निर्माण झालेला धोका आणि भारताशी मैत्रीचे संबंध ठेवण्याच्या मार्गात येणारे संभाव्य अडथळे हीच इटलीच्या दोन नौसैनिकांना भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे इटलीचे मावळते पंतप्रधान मारिओ मॉण्टी यांनी म्हटले आहे.
परराष्ट्रमंत्री गुलिओ तेरझी यांनी राजीनामा देण्याचे कारण केवळ नौसैनिकांचा प्रश्न इतकेच नाही, असे मॉण्टी म्हणाले. अंतरिम परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. विकसनशील देशांशी असलेल्या व्यापारसंबंधात बाधा येईल हेही एक कारण असले तरी नौसैनिकांना भारतात पाठविण्यामागे आर्थिक घटक कारणीभूत असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. तेरझी यांनी राजीनामा दिल्याने धक्का बसला. त्यांनी तशा प्रकारचे कोणतेही संकेत दिले नाहीत, असेही मॉण्टी म्हणाले.