दानिश यांच्या मृतदेहाची तालिबान्यांकडून विटंबना

तालिबानच्या हल्ल्यात जखमी झालेले सिद्दिकी त्यांच्या साथीदारांसह जवळच्या मशिदीत गेले व तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

पुलित्झर पारितोषिक विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात गोळीबारात हत्या केल्यानंतर तालिबानने मृतदेहाचीही विटंबना केली. त्यांची ओळख पटवल्यानंतर तालिबानने हे निर्घृण कृत्य केल्याचे अमेरिकेतील एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

सिद्दीकी हे अफगाणिस्तानमधील संघर्ष टिपण्यासाठी तिथे गेले होते. कंदहार शहराच्या स्पिन बोल्दाक भागात अफगाणी फौजा व तालिबान यांच्यातील संघर्षाचे छायाचित्रण करताना त्यांचा मृत्यू झाला.

‘वॉशिंग्टन एक्झामिनर’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानसोबतच्या सीमा चौकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाणी फौजा व तालिबान यांच्यात सुरू असलेल्या लढाईचे छायाचित्रण करण्यासाठी सिद्दिकी हे अफगाण नॅशनल आर्मीच्या पथकासोबत स्पिन बोल्दाक भागात प्रवास करत होते. एका सीमा चौकीपासून काही अंतरावर येऊन पोचल्यानंतर तालिबानच्या हल्ल्यामुळे हे पथक विभागले गेले आणि कमांडरसह काही लोक सिद्दिकीपासून वेगळे झाले. सिद्दिकी इतर ३ अफगाणी सैनिकांसोबत होते.

तालिबानच्या हल्ल्यात जखमी झालेले सिद्दिकी त्यांच्या साथीदारांसह जवळच्या मशिदीत गेले व तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, एक पत्रकार मशिदीत असल्याचे कळल्यानंतर तालिबानने त्या ठिकाणी हल्ला केला. तालिबानने सिद्दिकींना पकडले त्यावेळी ते जिवंत होते. तालिबानने त्यांची ओळख पटवली व त्यानंतर त्यांना साथीदारांसह ठार मारले. कमांडर व त्यांच्या पथकाने त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही मारण्यात आले, असे या वृत्तात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Danish body taliban defamation akp

ताज्या बातम्या