गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराने धुमसत असलेल्या दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी चक्क ‘ट्यूबलाईट’ आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी ट्यूबलाईट स्वतःच्या अंगावर फोडून घेत सरकारचा निषेध दर्शवला. तसेच गोरखा विभागीय परिषद या ऐतिहासिक कराराच्या प्रतही जाळल्या.

गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र गोरखालँड आणि अन्य मागण्यांसाठी दार्जिलिंगमधील पहाटी भागात गोरखा जनमुक्ती मोर्चाचे आंदोलन सुरु आहे. पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी १५ मे रोजी सर्व शाळांमध्ये बंगाली भाषा सक्तीची करण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दार्जिलिंगमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यात भर म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या भागात तृणमूलला एका जागेवर विजय मिळाला. यामुळे गोरखा अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने बंदची हाक दिली असून मंगळवारी बंदचा १३ वा दिवस आहे.

जुलै २०११ मध्ये केंद्र सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि गोरख जनमुक्ती मोर्चामध्ये करार झाला होता. यानुसार गोरखा विभागीय परिषदेची स्थापना झाली होती. या ऐतिहासिक कराराच्या प्रतही जाळण्यात आली.