Sexual Harassment Paper Leak News: नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत असताना उत्तरप्रदेशच्या लखनऊ विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला पेपर मिळवून देण्याचे आश्वासन देत तिच्याकडे अश्लील मागणी केली. प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी फोनवरून केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
परमजीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक आहे. त्याच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सदर प्राध्यापक बीएससीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीकडे लैंगिक संबंधांची मागणी करत असल्याचे सिद्ध झाले. प्राध्यापक म्हणाला, “डार्लिंग, मी तुझ्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडली आहे. परीक्षेपूर्वी इथे ये म्हणजे तुला ही प्रश्नपत्रिका मी देऊ शकेल.”
प्राध्यापकाच्या या मागणीनंतर सदर विद्यार्थिनीला मानसिक धक्का बसला. तिने विद्यापीठाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनंतर परीक्षा नियंत्रक विद्यानंद त्रिपाठी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हसनगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी परमजीत सिंग याने मात्र त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले असल्याचे आणि त्यातून लक्ष्य केल्याचा आरोप सिंग याने केला.
विद्यापीठाचे कुलगुरू जे. पी. सैनी यांनी या प्रकारानंतर अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली असून त्यांना २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एक प्रसिद्धीपत्रकही प्रशासनाने प्रसिद्ध केले. यात त्यांनी म्हटले की, संस्थेची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक वातावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.
याशिवाय ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी प्राध्यापकाच्या तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली. अभाविप लखनौ विद्यापीठ युनिटचे अध्यक्ष जय श्रीवास्तव यांनी यावर संताप व्यक्त करताना म्हटले की, एका प्रतिष्ठित संस्थेत अशा विकृत मानसिकतेला थारा देता कामा नये. लैंगिक छळ आणि परीक्षा प्रक्रिया धोक्यात आणल्याबद्दल आरोपीला तुरुंगात टाकले पाहिजे.
