असा एक अंदाज वर्तवला जातो की सुमारे सहा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका मोठा लघुग्रह आदळला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली, विशेषतः त्यावेळी पृथ्वीवर मुक्त संचार करणारे डायनॉसोरही पुर्णपणे नष्ट झाले. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवर लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह हे अनेकदा आदळले आहेत आणि यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. मग आत्ताच्या काळात एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर ? अशी लघुग्रहाची टक्कर टाळणे शक्य आहे का ? तेव्हा भविष्यात होऊ घातलेली लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी नासाने मोहिम हाती घेतली आहे.

नासा सध्या DART-Double Asteroid Redirection Test या मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीला धोका नसलेले पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन जवळुन प्रवास करणाऱ्या अनेक लघुहग्रहांपैकी एका लघुग्रहावर नासा एक यान अत्यंत वेगाने धडकवणार आहे. या माध्यमातून त्या लघुग्रहाची दिशा बदलवता येते का, लघुग्रहावर काय परिणाम होतो असा अभ्यास करणार आहे. या मोहिमेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग भविष्यात पृथ्वीवर आदळणाऱ्या संभाव्य लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी केला जाणार आहे.

नासाच्या DART या मोहिमेला सुरुवात झाली असून आज ‘स्पेस एक्स’ या खाजगी कंपनीने नासाच्या DART मोहिमेतील उपग्रहाचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या मोहिमेत सुमारे ६१० किलो वजनाचे यान हे पृथ्वीच्या जवळून काही काळ प्रवास करणाऱ्या Didymos लघुग्रहाच्या जवळून जाणार आहे. हे यान एक १३ किलो वजनाचा CubeSat वाहुन नेणार आहे. तर Didymos हा सुमारे ८०० मीटर लांबीचा लघुग्रह सुर्याभोवती ७७० दिवसा्त एक प्रदक्षिणा पुर्ण करतो. हा लघुग्रह काही काळ पृथ्वीच्या जवळून प्रवास करतो. विशेष म्हणजे या Didymos लघुग्रहा भोवती Dimorphos असं नामकरण केलेला, ३०० मीटर परिघ असलेला एक छोटा लघुग्रह फिरत असतो. तर या छोटेखानी Dimorphos लघुग्रहावर DART या यानाने वाहुन आणलेला CubeSat हा अत्यंत वेगाने धडकवण्याचा प्रयत्न नासा करणार आहे.

यामुळे Dimorphos लघुग्रहावर काय परिणाम होतो, त्याची दिशा बदलली जाते का, त्याचे तुकडे होतात का, लघुग्रहाच्या वेगावर परिणाम होतो का याचा अभ्यास नासा करणार आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात अशी टक्कर घडवून आणली जाणार आहे. तेव्हा भविष्यात एखाद्या लघुग्रहाची टक्कर पृथ्वीशी होऊ नये यासाठी विविध संकल्पना-मोहिमा नासा राबवत असून DART मोहिम हा याचाच एक भाग आहे.