तबलिगी जमात हे ‘दहशतवादाचे प्रवेशद्वार’ असल्याचे सांगून या संघटनेवर बंदी घालण्याच्या सौदी अरेबियाच्या निर्णयाचा दारूल उलुम देवबंद या इस्लामी पाठशाळेने निषेध केला आहे.

सौदी अरेबियाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा मुस्लिमांना चुकीचा संदेश जाईल, असे या पाठशाळेचे मुख्य अधिकारी (रेक्टर) मौलाना अबुल कासीम नोमानी यांनी म्हटले आहे. देवबंदच्या इस्लामी पाठशाळेने सौदी अरेबियाचा जाहीर निषेध करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘‘तबलिगी जमातने नेहमीच कुठल्याही अतिरेकी संकल्पनेला विरोध केलेला आहे. त्यामुळे सौदी अरेबियाच्या निर्णयाने मला आश्चर्य वाटले. सर्व आधुनिक जिहादी चळवळींबाबत जमातने नापसंती व्यक्त केली आहे. तालिबाननेदेखील अनेकदा तबलिगी जमातच्या विरोधात वक्तव्य केले आहे,’’ असे प्रमुख मुस्लीम कार्यकर्ते झफर सरेशवाला यांनी पीटीआयला सांगितले. तबलिगी हे दहशतवादाचे प्रवेशद्वार असल्याचे सौदी अरेबियाने केलेले वर्णन मान्य होण्यासारखे नाही, असे ते म्हणो.

‘‘तबलिगी जमातवरील हा मोठा आरोप आहे. आमचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही. तबलिगी जमात हा दहशतवाद थांबवणारा, दहशतवादाचा निषेध करणारा आणि दहशतवादाशी संबंध न ठेवणारा गट आहे,’’ असे हजरत निझामुद्दीन मर्कझच्या तबलिगी जमातचे प्रवक्ते समीरुद्दीन कासमी यांनी ब्रिटनमधून पाठवलेल्या व्हिडीओ संदेशात सांगितले.

‘‘आम्ही कुणालाही धर्म, समुदाय व देश यांच्या विरोधात बोलण्याची मुभा देत नाही. आम्ही फक्त इस्लामच्या पाच स्तंभांबाबत बोलतो. आमचा कुणीही माणूस कधीही कुठल्याच दहशतवादी कारवायात गुंतल्याचे आढळलेले नाही,’’ असाही दावा कासमी यांनी केला.