दारुल उलुम देवबंद दहशतवाद्यांचा अड्डाच: गिरिराज सिंह

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असून जिथे मुस्लिमांची संख्या वाढते तिथे सामाजिक एकोपा राहत नाही, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह

दारुल उलुम देवबंद हे शिक्षण नव्हे दहशतवाद्यांचा अड्डा आहे. हाफिज सईद, बगदादी हे देखील देवबंदचे विद्यार्थी होते, अशी माहिती मला स्थानिकांनी दिल्याचा दावा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. देशात ३० लाख मशिदी उभ्या राहतात, मग अयोध्येत राम मंदिर का नाही, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.

गिरिराज सिंह हे बुधवारी सकाळी देवबंद येथील स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्या देवीकुंड येथील महाकालेश्वर आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याशी जवळपास एक तास बंद खोलीत चर्चा केली. यानंतर ते त्रिपूर मा बाला सुंदरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. ब्रह्मानंद सरस्वती यांच्याशी काय चर्चा केली, याचा तपशील त्यांनी उघड केला नाही.

महाकालेश्वर आश्रमाबाहेर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या गुरुकुलमधून एकही दहशतवादी तयार झाला नाही. पण दारुल उलूम देवबंद हे शिक्षणाचं मंदिर आहे की दहशतवाद्यांचा अड्डा हेच कळत नाही. २६/११ हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद, बगदादी हे दोघेही तेथीलच विद्यार्थी असल्याचे मला लोकांनी सांगितले, असा दावाही त्यांनी केला. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असून जिथे मुस्लिमांची संख्या वाढते तिथे सामाजिक एकोपा राहत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Darul uloom deoband temple of terrorism hafiz saeed was student says union minister giriraj singh