बिघडलेल्या शेतीच्या आर्थिक गणितानं कर्जाबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. असं असतानाच आता छोट्या व्यावसायिकांच्या आत्महत्येचाही प्रश्न गंभीर झालाय. २०२० मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येपेक्षाही जास्त आत्महत्या छोट्या व्यावसायिकांनी केल्याचं एका आकडेवारीतून समोर आलंय. यामुळे आता शेतकऱ्यांसोबतच व्यावसायिकांचीही आर्थिक कोंडी झाल्याचं बोललं जातंय.

व्यावसायिकांच्या आत्महत्येचं कारण काय?

मागील काही काळात करोना साथीरोगाच्या संसर्गानंतर देशभरात लॉकडाऊन अंतर्गत कठोर निर्बंध लावण्यात आले. यानंतर व्यावसायिकांच्या विक्रीत आणि एकूणच उत्पन्नात कमालीची घट झाली. इतकंच नाही तर उत्पन्नासोबत व्यावसायिकांना करोना संसर्गाने देखील बाधित केलं. यामुळे रुग्णालयातील उपचाराचा खर्च आणि बंद झालेलं उत्पन्न अशा दुहेरी संकटाचा व्यावसायिकांना सामना करावा लागला.

कमाई शून्य, मात्र आजारपणाचा उपचार मोठा

एकूणच कोविड १९ च्या परिस्थितीनंतर व्यावसायिकांच्या उत्पन्नात देखील कमालीची घट झाली. त्याचवेळी घरातील वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. या विषम परिस्थितीमुळेच व्यावसायिकांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचा अंदाज लावला जात आहे. विशेष म्हणजे मानसिक पातळीवर खचलेल्या व्यावसायिकांना आवश्यक समुपदेशन किंवा मानसिक आधारही मिळाला नसल्याचं समोर आलंय. २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या.

हेही वाचा : धक्कादायक, २०२० मध्ये दरदिवशी ३१ मुलांच्या आत्महत्या, सरकारी आकडेवारीतून उघड, कारण काय? वाचा…

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार आत्महत्यांची आकडेवारी

देशातील आत्महत्यांच्या एकूण घटनांमध्ये मजुरांच्या आत्महत्या सर्वाधिक २४.६ टक्के असल्याचे NCRB अहवालात सांगण्यात आले आहे.

रोजंदारीवरील मजूर – २४.६ टक्के
गृहिणी – १४.६ टक्के
व्यवसायिक – ११.३ टक्के
बेरोजगार – १०.२ टक्के
नोकरदार – ९.७ टक्के
विद्यार्थी – ८.२ टक्के
शेतकरी – ७ टक्के
निवृत्त नोकरदार – १ टक्के
इतर – १३ टक्के