Dating App Fraud : आजकाल डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्रीच्या नावाखाली अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार पाहायला मिळतात. आता असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडला आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्रीच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुण आणि पाच मुलींना अटक केली आहे.
ही टोळी तरुणांना त्यांच्या कॅफेमध्ये बोलावून पैसे उकळत असायची अशी माहिती समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलिसांनी एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कौशांबी परिसरातील एका बनावट कॅफेमधून ही टोळी चालवली जात होती. या ठिकाणी काम करणाऱ्या मुली मुलांना डेटच्या नावाने फसवून या कॅफेमधून आणत असतं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर महागड्या वस्तू मागवल्या जायच्या. एवढंच नाही तर बिल दिले नाही तर मुलांना ओलीस ठेवलं जायचं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेतले जायचे.
हेही वाचा : नवऱ्याबरोबर मंदिरात गेलेल्या नवविवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नेमकं काय घडलं?
२१ ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीला एका कॅफेमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी मुलीने ऑर्डर केलेल्या कोल्ड्रिंक्सचे १६,४०० रुपये बिल आले. कोल्ड्रिंक्सचे एवढे बिल आल्यामुळे संबंधित तरुणाने विरोध केला असता कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर पडण्यापासून रोखत ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, यानंतर त्या व्यक्तीने ताबडतोब त्याचे लाइव्ह लोकेशन मित्राला शेअर केले आणि झालेल्या घटनेची माहिती मेसेजद्वारे दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असल्याच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आढळून आला. यातील चार महिला दिल्लीतील असून त्यांनी विविध डेटिंग ॲप्सवर प्रोफाइल ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून त्या पुरुषांना आकर्षित करत त्यांची फसवणूक करत असत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, “२२ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या दयालपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकरणासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. यानंतर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात आली. यामध्ये चौकशीत अटक केलेल्या कॅफे मालकाने कबूली दिली आहे की, आम्ही कॅफेमध्ये काम करणाऱ्या मुलींना डेटिंग ॲप्सवर मुलांशी बोलायला सांगायचो. त्यानंतर मुली त्यांना त्यांच्या कॅफेमध्ये भेटायला बोलावत. मुलांना घेऊन आल्यानंतर कॅफेमध्ये त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या किमतीच्या ५ ते ६ पट वाढ करून बिल द्यायचे आणि बिल देण्यास नकार दिल्यास ते त्यांना ओलीस ठेवत पैशांची मागणी करायचे.”