Dating App Fraud Revenge Case Manchester: ऑनलाईनचा वापर वाढल्यापासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. समाज माध्यमांचा वापर देखील सर्रास वाढला आहे. अलिकडे डेटिंगसाठी देखील ॲपचा वापर केला जात आहे. पण, याच डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका ३६ वर्षीय तरुणाने ब्रेकअपनंतर प्रेयसीचा सूड घेण्यासाठी धक्कादायक कृत्य केल्याचे उघकीस आले आहे. ग्रेटर मँचेस्टर परिसरात ही घटना घडली आहे.

ब्रेकअपनंतर प्रेयसीचा सूड घेण्यासाठी धक्कादायक कृत्य

एका ३६ वर्षीय तरुणाने ब्रेकअपनंतर प्रेयसीचा सूड घेण्यासाठी तिच्या नावाने ‘टिंडर’ या डेटिंग ॲपवर बनावट खाती उघडली. यानंतर तरुणाने अनोळखी पुरुषांना तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त केले. असद हुसेन असे या आरोपीचे नाव आहे. चेस्टर क्राउन कोर्टात पाठलाग आणि मारहाण करणे यासह तपासात सहकार्य न करणे या आरोपांसह खटला चालविण्यात आला असता तो या गुन्ह्यांत दोषी आढळून आला आहे.

​नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हुसेनने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीच्या नावाने टिंडरवर प्रोफाईल तयार केले. कळस म्हणजे हुसेनने यात प्रेयसीच्या ‘बलात्कार विषयक फॅन्टसी’ असल्याचे प्रोफाईमध्ये नमूद केले. “ती विरोध करत असेल किंवा नाही म्हणत असेल तर तिला अजून हवं आहे”, असा अत्यंत आक्षेपार्ह संदेश तो या प्रोफाईलच्या माध्यमातून अनोळखी पुरुषांना पाठवत होता. धक्कादायक बाब म्हणजे या संदेशांना बळी पडून १८ पुरुषांनी पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्यक्ष आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बनावट प्राफाईलद्वारे मैत्री

हे सगळे प्रकरण धक्कादायक असताना आरोपी हुसेन याने प्रेयसीबरोबर सुरुवातीला संपर्क साधण्यासाठी देखील बनावट प्रोफाईलचा वापर केला होता. हुसेन याने एप्रिल २०२४ मध्ये ‘मिक रेनी’ या बनावट नावाने पीडितेशी संपर्क साधला होता. दोघांमध्ये मैत्री होऊन त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. पण, एक महिन्यातच दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. हुसेन अत्यंत संशयी आणि भांडखोर होता असा आरोप करण्यात आला आहे. वादात त्याच्या प्रेयसीला शारीरिक इजा देखील झाल्याची माहिती उघड झाली आहे.

बदल्याची आग

ब्रेकअपनंतर संतापलेल्या हुसेनच्या डोक्यात बदल्याची आग धुमसत होती. जुलै २०२४ मध्ये त्याच्या डोक्यात एका सैतानी संकल्पनेने जन्म घेतला. त्याने ब्रेकअप झालेल्या प्रेयसीच्या नावाने टिंडर प्रोफाईल उघडले. या प्रोफाईलमध्ये त्याने अत्यंत आक्षेपार्ह मजकूर लिहला होता. या मजकूराला बळी पडून अनेकांनी पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वाढल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

असा घेतला पोलिसांनी शोध

​पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तपास घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुरुवातीला ‘मिक रेनी’ नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्यात सुरूवात केली, परंतु या नावाचा कोणतीही व्यक्ती आढळून आला नाही. अखेर पीडितेच्या घराबाहेरील डोअरबेल कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसलेल्या एका ऑडी R8 कारच्या क्रमांकावरून तपासाला गती मिळाली. ती कार असद हुसेनच्या नावे नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे तर, हुसेन मुद्दाम पीडितेच्या घरापासून काही अंतरावर आपली गाडी उभी करून तासनतास टिंडर प्रोफाईल्स हाताळत होता, असेही तपासातून समोर आले. हुसेनने ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मोबाईल फोन नष्ट केले, गॅजेट्स फॅक्टरी रीसेट केले, पण शेवटी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करुन आरोप सिद्ध करण्यात आले, असे ​चेशायर पोलिसांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.