पीटीआय, नवी दिल्ली

पाकिस्तानबरोबरची कोंडी फोडण्यासाठी थेट जनतेशी संपर्क महत्त्वाचा आहे आणि चर्चेसाठी नेहमीच संधी उपलब्ध असली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने भारताचा विश्वास गमावला आहे आता समाजाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे, असे होसबळे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. देशाची सुरक्षा आणि आत्मसन्मान जपला पाहिजे आणि सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. पण त्याच वेळी, संवादसेतू बंद ठेवून चालणार नाही, असे त्यांनी नमूद केले. त्याच दृष्टिकोनातून थेट जनतेशी सातत्याने संवाद साधल्यास दोन देशांमध्ये निर्माण झालेला तिढा सुटू शकेल, अशी अपेक्षा होसबळे यांनी व्यक्त केली.

पाकिस्तान दहशतवादाची पाठराखण करत असताना, भारताने त्यांच्याशी कसे वर्तन ठेवावे, असा प्रश्न विचारला असता, विविध मार्ग अवलंबले आहेत मात्र, पाकिस्तान कुरापत काढणे थांबवत नाही, हे पुलवामा, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांतून दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.

व्यापार आणि वाणिज्य, व्हिसा देणे थांबता कामा नये, कारण संवादासाठी एक संधी गरजेची असल्याचे म्हणाले. त्यामुळेच राजनैतिक संबंध टिकवून ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वात भारताविषयी तिरस्कार असल्याने तेथील शिक्षणतज्ज्ञ, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि समाजातील प्रमुख नेत्यांनी पुढे आले पाहिजे, असे होसबळे यांनी सुचवले.