IAS Medha Rupam Controversy coverage on Gyanesh Kumar Supreme Court Listing: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिल्यानंतर त्याविरोधात बरीच राळ उडत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या थेट राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांची कन्या आणि नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यादेखील एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात मेधा रूपम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या ‘लिस्टिंग’च्या पद्धतीवर वकिलांच्या एका संघटनेने थेट सरन्यायाधीशांकडे आक्षेप नोंदवला आहे.

ठरवून दिलेल्या रोस्टरचे उल्लंघन करून हे प्रकरण एका विशिष्ट खंडपीठाकडे सोपवण्यात आल्याचा आणि सुनावणीदरम्यान थेट प्रसारणाचा आवाज म्यूट (बंद) करण्यात आल्याचा गंभीर आरोप या संघटनेने केला आहे.

‘लॉयर्स असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशन’ (LAFC) या वकिलांच्या संघटनेने या संदर्भात सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र पाठवले आहे. मेधा रूपम यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी का घेण्यात आली? असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, १३ जुलै २०२६ पासून लागू असलेल्या अधिकृत रोस्टरनुसार नोएडातील कामगार आंदोलनाशी संबंधित प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची प्रकरणे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे प्रलंबित होती.

मेधा रूपम या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कन्या असल्याचा विशेष उल्लेख करत संघटनेने म्हटले आहे की, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संबंधित प्रकरणांना अशी विशेष वागणूक दिल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. एका विशिष्ट खंडपीठापुढे अशी विशेष सुनावणी निश्चित केल्याने न्यायालयीन प्रक्रियेवरील जनतेच्या विश्वासाला तडे जातात, असा आक्षेप या पत्रात घेण्यात आला आहे.

सुनावणीदरम्यान थेट प्रसारणाचा आवाज बंद

सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा आवाज म्यूट करण्याच्या निर्णयावरही संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मेधा रूपम यांच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उपस्थित होते. मात्र या सुनावणीदरम्यान अचानक थेट प्रसारणाचा ऑडिओ बंद करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय?

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, हे संपूर्ण प्रकरण नोएडातील एका कामगार आंदोलनादरम्यान दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि कार्यकर्ती आकृती चौधरी हिच्यावर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याशी (NSA) संबंधित आहे. २ सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आकृती चौधरी हिची स्थानबद्धता रद्द केली होती. तसेच तिला ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देत, ही रक्कम मेधा रूपम आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. याशिवाय उच्च न्यायालयाने नोएडा प्रशासनावर कडक ताशेरे ओढले होते.

उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात मेधा रूपम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या संपूर्ण आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र, नंतर आदेशात सुधारणा करत स्पष्ट केले की, ही स्थगिती केवळ मेधा रूपम यांच्यावरील ताशेरे आणि त्यांच्या पगारातून ५ लाख रुपयांची भरपाई वसूल करण्याच्या निर्देशांपुरतीच मर्यादित राहील. आकृती चौधरी हिची एनएसए अंतर्गत झालेली स्थानबद्धता रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

‘सीजेपी’चे सौरव दास यांचे आरोप

दरम्यान या घडामोडींवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत या प्रकरणाची तुलना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाशी संबंधित सुरू असलेल्या व्यापक वादाशी केली.

न्यायमूर्ती शर्मा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दास यांनी आरोप केला की, हे प्रकरण नियमांना डावलून प्राधान्याने सुनावणीसाठी घेण्यात आले. सुनावणीचा आवाज म्यूट करण्यावर न्यायमूर्तींच्या बाजूने कोणताही खुलासा आला नसून ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे दास म्हणाले.