Salim Dola Dawood Ibrahim aide arrested in Istanbul Turkey drug trafficking case update : कुख्यात दाऊद इब्राहिम टोळीचा अनेक दशकांपासून पाठलाग करणाऱ्या भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हवा असलेला फरार गुन्हेगार आणि अमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला तुर्कियेमधील इस्तंबूल येथे ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्याम माहितीनुसार डोला याला तुर्कियेची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी असून तो सीमेपलीकडून होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यातील एक मुख्य समन्वयक असल्याचे सांगितले जाते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि राज्यांच्या पोलीस पथकांकडून करण्यात आलेल्य तपासादरम्यान अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणांमध्ये त्याचे नाव वारंवार समोर आले आहे.

तपास यंत्रणांच्या मते, डोला हा डी-कंपनीच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा भाग होता. हा भारत आणि जवळपासच्या देशांमध्ये कार्यरत असलेल्या नेटवर्कशी संबंधित अमली पदार्थांचे लॉजिस्टिक्स आणि वितरण यावर देखरेख ठेवत होता. मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात अनेक जणांना अटक झाल्यानंतर त्याचे नाव फरार आरोपी म्हणून समोर आले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

डोला कोण आहे?

सलीम डोला (५९) मेफेड्रोन (MD) उत्पादन करणारा आणि फरार डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. डोंगरीचा रहिवासी असलेला डोला हा जवळपास १० वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला आणि तेव्हापासून तो परदेशातून आपले काळे धंदे चालवत होता. डोला हा देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या अमली पदार्थांचे नेटवर्क चालवत होता. भारतीय यंत्रणा अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने त्याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२४ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने ४ किलो एमडी जप्त केल्यानंतर, या प्रकरणाच्या तपासात डोला याचा सहभाग उघड झाला होता. या तपासात सांगली आणि सुरतपासून ते युएई आणि तुर्कियेपर्यंत पसरलेली पुरवठा साखळी उघड झाली होती. डोला परदेशात बसून आपल्या हस्तकांमार्फत हे ऑपरेशन चालवत होता. गेल्या वर्षी इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा मुलगा ताहेर आणि पुतण्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना युएईतून हद्दपार करण्यात आले होते. यामुळे डोला याचे नेटवर्क कमकुवत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नार्कोटीक्स एजन्सीच्या रडारावर असलेल्या डोलाचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल्सशी जोडले गेले आहेत. त्याला सर्वात आधी १९९८ मध्ये मुंबई विमानतळावर ४० किलो मँड्रॅक्ससह अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या मतेसलीम मिर्चीनंतर डी-कंपनीच्या अमली पदार्थांशी संबंधित व्यवहार डोला सांभाळत होता.

या बरोबरच १ हजार कोटी रूपयांचा फेंटॅनिल साठा आणि डीआरआय गुटखा तस्करी प्रकरणासारख्या मोठ्या कारवायांमध्येही त्याचे नाव समोर आले होते. तपास यंत्रणांच्या मते, त्याची टोळी एमडी तयार करण्यासाठी पैसे पुरवणे, प्रीकर्सर पुरवठा करणे अशी कामे करते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने यापूर्वी त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.