Dawood Ibrahim Net Worth and global underworld operations exposed: कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती त्याचे अवैध व्यवसाय आणि त्याचे पाकिस्तानसह अंडरवर्ल्डबरोबर असणारे जगभरातील संबंध याबाबत धक्कादायक खुलासे विवेक अग्रवाल यांनी केले आहेत. गुन्हेगारी विषयाचे पत्रकार आणि लेखक विवेक अग्रवाल यांनी राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत दाऊदच्या नेटवर्कबाबत सविस्तर माहिती दिली आहे. राज शमानीच्या ‘डायलॉग विथ विवेक अग्रवाल’ या शोमध्ये अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.

दाऊदची एकूण संपत्ती किती?

विवेक अग्रवाल यांनी शमानीला मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर (म्हणजेच अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांहून अधिक) इतकी आहे. ही संपत्ती केवळ रोख स्वरुपातच नव्हे तर जगभरात विविध माध्यमातून पसरली आहे. दाऊदचे लंडनमध्ये आलिशान हॉटेल्स आणि दुबईत व्यावसायिक इमारती असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. दाऊदचे आशिया, युरोप आमि आफ्रिकेसह डझनभर देशात त्याचे जाळे विस्तारले असल्याचे त्यांनी नमूद केले. 

बेकायदेशीर व्यवसाय उत्पन्नाचे साधन

दाऊदचे उत्पन्नाचे साधन बेकायदेशी व्यवसाय असल्याचे अग्रवाल मुलाखतीत सांगतात. अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांचा व्यापार तो प्रामुख्याने करतो. याशिवाय बनावट नोटांचा व्यापार, खंडणी आणि अवैध सट्टेबाजीतून दाऊद पैसा उभा करतो, असे अग्रवाल सांगतात. दाऊदने ब्लॅक पैसा व्हाईट करण्यासाठी जगभरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. लंडन मोरोक्को, स्पेन आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याने शेल कंपन्या उभारल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दाऊद हा केवळ एक गँगस्टर नसून तो एक ‘ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर’ बनला आहे, असे अग्रवाल यांनी नमूद केले. 

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेत शिरकाव

दाऊदने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत खोलवर शिरकाव केल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. दाऊद पाकिस्तानमध्ये शेल कंपनीच्या माध्यमातून ड्रग्ज आणि शस्त्रांचा अवैध पुरवठा करुन पैसा कमावतो. दाऊदाने पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने बँकिंग चॅनल्सचा वापर केला यासाठी त्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने मदत केल्याचे अग्रवाल सांगतात. याशिवाय रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक तसेच, स्टॉक मार्केटमध्येही दाऊदचा हस्तक्षेप असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. यासगळ्यासाठी दाऊदला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची मोठी मदत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रहमान डकैत आणि दाऊदची तुलना

विवेक अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे दाऊदची मुंबईत दहशत होती तशीच दहशत कराचीच्या लियारीमध्ये रहमान डकैतची होती.रहमानला कराचीमधील सर्वात मोठा गँगस्टर मानले जात होते. रहमानची दाऊदला मोठी मदत झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. कराची बंदरावर ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रहमाच्या अवैध व्यवसायाला दाऊदने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. रहमानला राजकीय पक्षांचा छुपा पाठिंबा होता, असेही अग्रवाल यांनी मुलाखतीत सांगितले. रहमान डकैत स्ट्रीट डॉन होता तर दाऊद कॉर्पोरेट डॉन असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.