अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतात परतण्याची तयारी दर्शवली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आर्थर रोड तुरुंगात ठेवावे अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली होती, असा दावा मंगळवारी ठाण्यातील न्यायालयात करण्यात आला. मात्र, सरकारने दाऊदचा प्रस्ताव अमान्य केला आणि अजूनही दाऊदला अटक झाली नाही, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला मंगळवारी ठाण्यातील जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मिरा रोडमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊद, त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि अनीस हे तिघे आरोपी आहेत. कासकरच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार सुनावणीदरम्यान न्या. आर. व्ही. थामडेकर यांनी कासकरला काही प्रश्न विचारले. ‘तुझ्या कुटुंबीयांना धोका आहे किंवा ते नेमके कुठे आहेत या बद्दल काही माहिती आहे का?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर कासकरने नाही असे उत्तर दिले. पुढे न्यायाधीश म्हणाले, गेल्या काही वर्षांत तुमचे दाऊदशी बोलणे झाले का?. त्यावर कासकरने होकार दिला. माझे मोबाईलवर बोलणे झाले, मात्र त्याचा नंबर कधीही समजू शकला नाही, असे त्याने न्यायालयात सांगितले.

यादरम्यान, कासकरची बाजू मांडणारे वकील श्याम केसवानी यांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. दाऊदला भारतात परतायचे आहे. राम जेठमलानी यांनी सरकारला याबाबत माहिती देखील दिली. दाऊदने सरकारसमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र सरकारने दाऊदची मागणी फेटाळून लावली आणि त्याला अजूनही अटक होऊ शकली नाही, असे त्यांनी कोर्टात सांगितले.

कासकरला मधूमेह असून त्याला यासाठी वैद्यकीय उपचाराची गरज आहे, असा दावाही केसवानी यांनी केला. यावर न्यायालयाने कासकरला ठाण्यातील सरकारी रुग्णालयात न्यावे, असे आदेश पोलिसांना दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने कासकरच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.

दाऊद इब्राहिमला भारतात यायचे आहे. त्याची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी सेटलमेंट सुरू आहे, असा गौप्यस्फोट काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. दाऊदला भारतात आणल्याचे श्रेय या सरकारला घ्यायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.