माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवरून मुघल साम्राज्याचा परिच्छेद काढून टाकला असून त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी knowindia.gov.in च्या ‘संस्कृती आणि वारसा’ विभागाला फोटो गॅलरीमध्ये बदलण्यात आले आहे. भारताचा इतिहास, परंपरा, स्मारके, कला आणि इतर उपक्रम दाखवणारे विभाग मंगळवारी काढून टाकण्यात आले होते. मात्र, बुधवारी पुन्हा ते विभाग दिसत आहे. पण त्यावर कोणताही मजकूर दिसत नाही. तिथं केवळ नृत्यप्रकार आणि स्मारके दर्शविणारे ३० फोटो दिसत आहेत.  सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “दुरुस्त केलेला मजकूर आणि वास्तविक इतिहासाचे चित्रण” पुढच्या काही आठवड्यांत वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

सोमवारी, आयटी मंत्रालयाच्या साइटवरील एक परिच्छेदामध्ये मुघल साम्राज्याचे वर्णन “सर्वात महान” म्हणून करण्यात आले होते. यानंतर अनेकांनी सांस्कृतिक मंत्रालयाला टॅग करून याबद्दल सोशल मीडियावर तक्रारी केल्या. मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देताना “इतिहासातील घटनांचे अचूक चित्रण” करण्यासाठी एजन्सींसोबत काम करत असल्याचं म्हटलंय. ट्विटमध्ये म्हटलंय की, “भारताच्या इतिहासाचे चुकीचे वर्णन करणारा मजकूर नो इंडिया वेबसाइटवर (KnowIndia.gov.in) असल्याचं निदर्शनात आलंय. ही वेबसाइट सांस्कृतिक मंत्रालय चालवत नाही. इतिहासातील घटनांचे अचूक चित्रण करण्यासाठी संबंधित एजन्सीसोबत आम्ही काम करत आहोत.”

वेबसाईटवरील मध्ययुगीन भारत पृष्ठावर असलेल्या मुघलांवरील परिच्छेदात म्हटलंय की, “भारतात, मुघल साम्राज्य हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते. मुघल साम्राज्याने कोट्यवधी लोकांवर राज्य केले. भारत त्यांच्या राजवटीखाली एक झाला  आणि मुघल राजवटीतील सांस्कृतिक आणि राजकीय काळ हा अतिशय समृद्ध होता. मुघल साम्राज्याचे संस्थापक येईपर्यंत संपूर्ण भारतात अनेक मुस्लिम आणि हिंदू राज्यांची विभागणी झाली.” दरम्यान, ही वेबसाईट आयटी मंत्रालयाअंतर्गत संलग्न असलेल्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे चालवली जाते.

मुंबईतील लेखक रतन शारदा यांनी ट्विटरवर हा मुद्दा उचलून धरला होता. त्यांनी म्हटलं की, “सरकारी वेबसाइट आणि अगदी स्मारकांच्या बाहेरच्या फलकांवरही आपल्या इतिहासाची चुकीची मांडणी केली जाते किंवा ते खरोखर चुकीचे आहेत. संबंधित नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी या मजकुराची पुन्हा एकदा पाहणी करायला पाहिजे. भारतीय इतिहासाच्या कोणत्याही भागाला पुसून काढण्याचा प्रयत्न करणारा प्रकार आता सुधारायला हवा.” यावेळी त्यांनी अजिंठा-एलोरा लेण्यांचे उदाहरण दिले. या लेण्यांच्या बाहेर असलेल्या फलकावर “बौद्ध, जैन आणि ब्राह्मणी लेणी” असं म्हटलंय. मात्र, “ब्राह्मणी लेणी” नावाच्या कोणत्याच लेण्या नसल्याचं त्यांनी म्हटलं.