हेटेरो ग्रुपच्या करोनावरील औषधाला डीसीजीआयची मंजुरी

औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या करोनावरील औषधाला भारतीय औधष नियंत्रण महामंडळानं मंजुरी दिली आहे.

Corona
हेटेरो ग्रुपच्या करोनावरील औषधाला डीसीजीआयची मंजुरी (Photo- ANI)

देशात करोनाची धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत करोना प्रतिबंधक सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरु असताना करोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आता औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या करोनावरील औषधाला भारतीय औधष नियंत्रण महामंडळानं मंजुरी दिली आहे. करोनावरील उपचारासाठी प्रौढांवर आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. हेटेरोने याबाबतची माहिती दिली आहे. “रुग्णालयात दाखल असलेल्या प्रौढांवर उपचारासाठी डॉक्टर टोसिलिझुमॅबचा (टोसिरा) वापर करू शकतात”, असं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. हैदराबाद येथील हेटेरोच्या प्लांटमध्ये टोसिराची निर्मिती केली जाणार आहे. हेटेरो करोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर आणि फॅविपीरावीरची निर्मिती देखील करते.

“भारतात हेटेरोच्या टॉसिलिझुमॅब (टोसिरा) ला मंजुरी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोतं. यामुळे करोनावर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.”, असं हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉ. बी पार्थ सारधी रेड्डी यांनी सांगितलं आहे.

“हे औषध सिस्टमिक कॉर्टिकोस्टिरॉईड्स, अत्यावश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) वर असलेल्या रुग्णांवर वापरले जाऊ शकते. या औषधाचं न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करू.”, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

देशातील करोना स्थिती

देशात गेल्या काही दिवसांपासून सतत ४० हजारांपेक्षा रुग्ण आढळत होते. पण दिलासादायक म्हणजे देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ हजार ९०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. रविवारच्या तुलनेत आज सापडलेली रुग्णसंख्या ८.९ टक्क्यांनी कमी आहे. रविवारी देशात ४२ हजार ७६६ करोनाबाधित आढळले होते. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.४४ टक्क्यांवर आहे. देशात सध्या ४ लाख ४ हजार ८७४ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख २७ हजार ६२१वर पोहोचले आहेत. त्यापैकी ३ कोटी २१ लाख ८१ हजार ९९५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ लाख ४० हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.५८ टक्क्यांवर असून हा दर सलग ७३व्या दिवशी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट २.७६ टक्के आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांत २५ लाख २३ हजार ८९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६८.७५ कोटी लोकांचं लसीकरण झालंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dcgi approves hetero tocilizumab for treatment of corona rmt