Eknath Shinde addressing Uddhav Thackeray as Saheb in Vidhan Parishad: आज (ता. २४) रोजी विधानपरिषदेचे नऊ सदस्य निवृत्त झाले. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सभागृहाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह इतर सहा जणांचा समावेश आहे. विधानपरिषदेत झालेल्या निरोप समारंभात शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘विशेष’ उल्लेख केला.

निवृत्त झालेल्या नऊ सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत. त्यामध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याशिवाय उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि राजेश राठोड यांचीही मुदत संपली आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त दोन सदस्य निवडून येऊ शकतात.

एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!

निरोप देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख केला. ते म्हणाले, “आज या सभागृहातील नऊ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेसाहेब, डॉ. नीलमताई गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनकर यांचा समावेश आहे. हे सर्व सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवृत्त होत आहेत. यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील, त्यांना मी शुभेच्छा देतो.” पुढे ते म्हणाले, “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरेसाहेब आज विधानपरिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो, अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठीही खूप-खूप शुभेच्छा.”

नीलम गोऱ्हेंचा विक्रम!

नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, त्या सलग २४ वर्षे या सभागृहात कार्यरत आहेत. रा. सु. गवई हे सर्वाधिक सलग ३० वर्षे सदस्य होते, तर त्यानंतर वि. स. पागे यांच्या नावावर २४ वर्षांचा विक्रम आहे. त्या विक्रमाची बरोबरी नीलमताईंनी केली आहे. उपसभापती म्हणून त्यांनी अत्यंत कणखरपणे काम केले, असेही त्यांनी नमूद केले.

शिंदेकडून अजितदादांचा उल्लेख

अमोल मिटकरी यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “अमोल मिटकरी हे ‘सिर्फ नाम ही काफी’ आहेत. ते कडवे कार्यकर्ते आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे हळवे रूपही पाहायला मिळाले. आज अजितदादा असते, तर त्यांनी मिटकरींचे भरभरून कौतुक केले असते.” शशिकांत शिंदे यांच्याबद्दल ते म्हणाले की, “आमचा जन्म एकाच मातीत झाला असून आमचे आडनावही एकच असल्याने आमचे नाते गावकी आणि भावकीचे आहे. साताऱ्याची माती झुंज देण्याची शिकवण देते. शिंदे हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. सातारा जिल्हा परिषद प्रकरणात त्यांनी सत्याची बाजू घेतली.”

याशिवाय रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे आणि राजेश राठोड यांच्या कामाचाही उल्लेख करत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या निरोप समारंभात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पक्षफुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर हा उल्लेख विशेष चर्चेचा विषय ठरला.