भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा येथे हलवले जात असल्याचं वृत्त काही उर्दू प्रसारमाध्यमांमध्ये दिलं जात असल्याची माहिती गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्ता सेनगे हसनैन सीरिंग यांनी दिली आहे. हसनैन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याने बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांचा यावेळी मुजाहिद म्हणून उल्लेख करण्यात आला आहे ज्यांना पाकिस्तान सरकारला लढाईसाठी पाठिंबा दिल्याबद्दल अल्लाहकडून विशेष सवलत मिळते’.

हसनैन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बातचीत करताना सांगितलं की, ‘हा व्हिडीओ किती खऱा आहे याबाबत मला खात्री नाही. पण बालाकोटमध्ये जे काही झालं त्याबद्दल पाकिस्तान काहीतरी लपवत आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याची परवानगी देण्यात आली नाही. पाकिस्तानने वारंवार स्ट्राइक झाला मात्र त्यात आमच्या जंगलाचं आणि शेतजमिनीचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. पण यामुळे इतक्या काळासाठी परिसरात प्रवेशबंदी ठेवण्याचं कारण काय आहे? आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी भेट देऊन त्यांचं मत तयार करण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे’.

‘त्याचवेळी जैश-ए-मोहम्मद तिथे मदरसा होतं असा दावा करतं. तर दुसरीकडे उर्दू प्रसारमाध्यमं स्ट्राइकनंतर काही दिवसांत मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा आणि काही आदिवासी परिसरांमध्ये हलवण्यात आले असल्याचं वृत्त देत आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक यशस्वी होता हे सिद्ध होत आहे. तर पाकिस्तान काहीच पुरावे सादर करु शकलेला नाही’, असंही त्यांनी सांगितलं आहे.