Farmers Protest : “एक हात तोडून मृतदेह बॅरिकेड्सला बांधला”, सिंधू बॉर्डरवरील हत्याकांडाने देशभरात खळबळ

दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडालीय.

दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडालीय. हत्याऱ्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला. या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार झालेले दिसत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय.

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, “सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला.”

“याला कोण जबाबदार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती हंसराज यांनी दिली.

“या हत्येला निहंगा जबाबदार”

दरम्यान, ४० शेतकरी संघटना एकत्र येऊन तयार झालेल्या संयुक्त किसान मोर्चाने (Samyukta Kisan Morcha – SKM) या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप केलाय. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, “या हत्येमागे निहंगा आहेत. त्यांनी हे मान्य केलंय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत.”

हेही वाचा : शेतकऱ्यांना चिरडल्याची ‘ती’ घटना पुन्हा जशीच्या तशी उभी राहणार; मंत्र्यांच्या मुलाला घेऊन पोलीस लखीमपूरमध्ये दाखल

संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचं म्हटलंय. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे.

हत्येचं कारण काय?

या हत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलिसांनी देखील याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, हत्येच्या कारणांबाबत अनेक चर्चा आहेत. त्यापैकी एक चर्चा निहंगा शिख समुहातील काही लोकांनी ही हत्या केल्याची आहे. पीडित व्यक्तीने शिख धर्माचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’चा अपमान केल्यानं ही हत्या झाल्याचं बोललं जातंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deadbody with one hand cutting found near singhu border farmer protest pbs

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या