काँग्रेसने केवळ गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचाच पुरस्कार केल्याचा आरोप करीत केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाची वानवा असल्याची टीका सोमवारी केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्त्वावर हल्ला चढवला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आशा कुमारी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे पंजाब कार्यभार सोपविण्यात आला आहे. या नियुक्तीच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवला. आशा कुमारी यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप असून सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली. संबित पात्रा म्हणाले, आशा कुमारी यांच्या नियुक्तीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाची वानवा आहे. त्या पक्षाने आतापर्यंत केवळ गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचाच पुरस्कार केला.
पंजाबचे प्रभारी म्हणून काम पाहात असलेल्या कमलनाथ यांनी १५ जून रोजी त्या पदाचा राजीनामा दिला होता. १९८४ दंगली प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी पंजाबचे प्रभारीपद सोडून दिले होते. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुमारी यांच्या नियुक्तीने नवा वाद निर्माण झाला आहे.