बंगळूरु : मानवी हक्काच्या उल्लंघनाची मोठी घटना रविवारी बंगळूरुत घडली असून तीन सफाई कामगारांचा मॅनहोलमध्ये उतरुन स्वच्छतेचे काम करताना विषारू वायूने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दक्षिण बंगळूरुतील उच्चभ्रू परिसरात ही घटना घडली आहे. हाताने मैला उचलण्याच्या अमानुष पद्धतीवर भारतात कायद्याने बंदी असतानाही बऱ्याच भागात अजूनही हे थांबलेले नाही. अनेकदा सफाई कामगार मेनहोलमध्ये उतरून काम करताना दिसतात.

नारायण स्वामी (वय ३५), महादेव गोवडा (४२) आणि श्रीनिवास (५२) या तिघांचा मॅनहोलमध्ये उतरल्याने विषारु वायूमुळे मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये उतरल्यानंतर स्वामी आणि गोवडा यांचा जागीच मृत्यू झाला मात्र, महादेव यांना उपचारांसाठी कोलंबिया एशिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सेंट जॉन रुग्णालयात त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत.


या मृत्यूंचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी शवविच्छेदनानंतर ही बाब स्पष्ट होणार आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमधील मृत्यू हे गटारात निर्माण होणारे विषारू वायू आणि गुदमरल्याने होतात, असे सेंट जॉन रुग्णालयाचे डॉ. संजीव लेवीन यांनी सांगितले.

दरम्यान, बंगळूरूचे महापौर संपथ राज यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेट दिली असून या घटनेप्रती दुःख व्यक्त केले आहे. स्वच्छतेसाठी प्रशासनाकडे अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र, तरीही लोक गटारांच्या स्वच्छतेसाठी बिगारी आणि स्वच्छता कामगारांनाच बोलावतात. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असल्याने ते हे काम करण्यासाठी तयार होतात, असे राज यांनी म्हटले आहे.