एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : २०२० साली देशात ८१.१६ लाख मृत्यूंची नोंद झाल्याचे महानिबंधकांच्या (रजिस्ट्रार जनरल) कार्यालयाने मंगळवारी जारी केलेल्या नव्या आकडेवारीत म्हटले आहे. आधीच्या वर्षीपेक्षा करोना महासाथीच्या वर्षांत नोंदला गेलेला हा आकडा ६ टक्क्यांनी अधिक असून, देशात जन्म व मृत्यू यांच्या वाढत्या नोंदणीचा अलीकडचा कल पाहता त्याच्याशी तो सुसंगत आहे.

२०२० सालची जन्मनोंदणी २०१९ सालच्या २.४८ वरून कमी होऊन २.४२ कोटींवर आली; तर २०१९ साली झालेली मृत्यू नोंदणी वाढून ८१.१६ लाख झाली, असे नागरी नोंदणी यंत्रणेतील (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम- सीआरएस) आकडेवारीतून दिसून आले आहे. हे २०२० सालातील देशातील जन्म व मृत्यू यांचे वास्तविक आकडे नसून, केवळ नोंदणी झालेल्या जन्म व मृत्यूंची आकडेवारी आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीत हळूहळू वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांत विशेषत: मृत्यू नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, २०१९ साली देशात झालेल्या मृत्यूंपैकी ९२ टक्के मृत्यूंची नोंद झाली. त्याच्या दोन वर्षे आधी (२०१७) साली झालेल्या ७९ टक्के नोंदणीच्या तुलनेत ही उल्लेखनीय वाढ होती. आता सर्व जन्मांपैकी जवळपास ९५ टक्के जन्मांची नोंदणी केली जाते.

२०२०च्या मृत्यूच्या आकडेवारीला विशेष महत्त्व असण्याचे कारण, या वर्षी करोनामुळे मोठय़ा संख्येत झालेले मृत्यू. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२०मध्ये १.४९ लाख करोनामुळे मरण पावले. आजच्या आकडेवारीचा विचार करता, ५.२३ लाखांहून अधिक लोक करोनामुळे मरण पावले असल्याची माहिती आहे.