अमेरिकेच्या औषध नियामक संस्थेचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृद्ध लोकांसाठी तसेच सह आजार असलेल्या जोखमीच्या  व्यक्तींसाठी वर्धक लस मात्रेला अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने गुरुवारी  मंजुरी दिली आहे. अमेरिकेतील कोविड लसीकरणात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेच्या संचालक डॉ. राशेली वॅलेन्स्की यांनी या आदेशावर गुरुवारी स्वाक्षरी केली. याआधी सर्वांना सरसकट वर्धक मात्रा न देण्याची शिफारस करण्यात आली होती.

सल्लागारांनी असे म्हटले होते, की केवळ ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना तसेच शुश्रूषागृहात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ५० ते ६४ वयोगटातील जोखीम असलेल्या व्यक्ती यांना वर्धक लसमात्रा देण्यात यावी. फायझरची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा  महिन्यांनी ही वर्धक मात्रा देण्यात येणार आहे. वॅलेन्स्की यांनी सांगितले, की एक शिफारस स्वीकारण्यात आली असून एक नाकारण्यात आली आहे. वृद्ध व जोखमीच्या व्यक्तींना वर्धक लसमात्रा देण्याची शिफारस मान्य करण्यात आली असून १८ ते ६४  वयोगटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सरसकट वर्धक मात्रा देण्याची शिफारस फेटाळण्यात आली आहे. जोखमीचे काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींना लस देण्याची शिफारसही फेटाळण्यात आली आहे. सुदृढ आरोग्य कर्मचाऱ्यांना वर्धक लस देण्याची गरज नाही, असेही सांगण्यात आले. ओहायो स्टेट विद्यापीठाचे डॉ. पाबियो सँचेझ यांनी सर्वांना सरसकट वर्धक मात्रा देण्याच्या शिफारशीस विरोध केला. अन्न व औषध प्रशासनाने याआधी व़ृद्ध, आरोग्य कर्मचारी व सहआजार असलेले जोखमीतील लोक यांना वर्धक लसमात्रा देण्याची शिफारस केली होती. अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या कोविड लशी या परिणामकारक असून सरसकट सर्वांना किंवा सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीची वर्धक मात्रा देण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. केवळ ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना वर्धक लसमात्रा देण्यास हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेत १८.२ कोटी लोकांचे म्हणजे ५५ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.

आरोग्य संघटनेची प्रतिपिंड उपचारांची शिफारस

नवी दिल्ली : कोविड १९ विषाणू संसर्गाने रुग्णालयात दाखल करण्याची जोखीम असलेल्या गंभीर रुग्णांना दोन प्रकारचे प्रतिपिंड देण्याच्या उपचारांना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली असून त्यात प्रतिपिंड उपचार गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्व विकास गटाने अशी शिफारस केली की, कोविड १९ च्या गंभीर रुग्णांना कॅसिरीविमॅब व इमडेवीमॅब या दोन प्रकारच्या प्रतिपिंडांचे उपचार देण्यास हरकत नाही.  ज्या रुग्णांना प्रतिपिंड उपचार देण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यात ज्यांची प्रकृती गंभीर नाही पण ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे त्यांचा समावेश पहिल्या गटात करण्यात आला आहे. दुसऱ्या गटात कोविड १९ च्या गंभीर रुग्णांचा समावेश आहे.

 हे अशा प्रकारचे रुग्ण असतात ज्यांच्यात कोविड १९ प्रतिपिंड हे नैसर्गिक पातळीवर सक्रिय झालेले नसतात. त्यामुळे त्यांची स्वत:ची प्रतिकारशक्ती काम करीत नसते त्यामुळे त्यांना प्रतिपिंड उपचार देण्यात यावेत असे संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.  पहिली शिफारस ही तीन चाचण्यांवर आधारित असून त्यात कॅसिरिविमॅब व इमडेवीमॅब हे प्रतिपिंड उपचार रुग्णालयात दाखल करावे लागण्याची जोखीम असलेल्या रुग्णात प्रभावी ठरले आहेत. दुसरी शिफारस ही आणखी एका प्रकारच्या चाचण्यांवर आधारित असून त्यात प्रतिपिंडांचे उपचार दिल्याने मृत्यूची शक्यता कमी झाली आहे. त्यात कृ त्रिम श्वास यंत्रणाही लागत नाही हे रुग्ण सेरो निगेटिव्ह असतात, म्हणजे त्यांना कोविड संसर्ग होऊनही प्रतिपिंड तयार झालेले नसतात. गंभीर रुग्णात कॅसिरिविमॅब व इमडेविमॅब या दोन प्रकारच्या प्रतिपिंड उपचारांनी गंभीर रुग्णात हजारामागे ४९ तर अतिगंभीर रुग्णात हजारात ८७ बळी कमी जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision of the american drug regulatory authority akp
First published on: 25-09-2021 at 12:05 IST