scorecardresearch

‘यूएपीए’अंतर्गत समान आरोपांमुळे उमर, सैफीच्या सुटकेचा निर्णय

ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद आणि ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे संस्थापक खालिद सैफी यांना मुक्त करण्याचे तपशीलवार कारण दिल्ली न्यायालयाने दिले आहे.

‘यूएपीए’अंतर्गत समान आरोपांमुळे उमर, सैफीच्या सुटकेचा निर्णय
उमर खालिद, खालिद सैफी

सविस्तर आदेशात दिल्ली न्यायालयाकडून कारण स्पष्ट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद आणि ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे संस्थापक खालिद सैफी यांना मुक्त करण्याचे तपशीलवार कारण दिल्ली न्यायालयाने दिले आहे. त्यात या आरोपींना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) याआधीच समान आरोपांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या सुटकेचा निर्णय आपण घेत आहोत.

२४ फेब्रुवारी २०२० रोजी चांदबाग भागात जमाव जमलेला असताना तेथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी हा शिपाई जेव्हा स्थानिक बंदिस्त वाहनतळाच्या जागेत लपण्यासाठी पळाला, तेव्हा जमावाने कथितरीत्या या वाहनतळाचा दरवाजा तोडून आत लपलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. तसेच वाहनांनाही आग लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने खालिद आणि सैफीला शनिवारी मुक्त केले. परंतु या दोघांनाही ‘यूएपीए’अंतर्गत गुन्ह्यांतर्गत अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांची या प्रकरणी न्यायालयीन कोठडी कायम असणार आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या मालकीच्या इमारतीचा दंगलखोरांनी दगडफेकीसाठी वापर केल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला. उमर आणि सैफी यांना गुन्हेगारी कटाचा भाग असल्याने या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, असा युक्तिवाद फिर्यादी पक्षाने केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमचला यांनी नमूद केले, की उमर आणि सैफी यांच्यावर केलेले आरोप हे कट रचण्यापुरते मर्यादित नसून, दिल्लीत दंगल करण्याच्या व्यापक कटाशी पर्यायाने ‘यूएपीए’ प्रकरणाशी संबंधित आहेत. या दोघांविरुद्ध दिल्लीत दंगल भडकवण्याच्या मोठय़ा कटाच्या आरोपाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, हे दोन आरोपी सध्याच्या खटल्यात दोषमुक्त होण्यास पात्र आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या