कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. अघोषित आणीबाणीपेक्षा त्यांनी थेट आणीबाणीच जाहीर करून टाकावी असं आव्हान अभिजीत दिपकेंनी दिलं आहे. सौरव दास, आशुतोष रांका हे जंतर मंतर परिसरात आंदोलन करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अटक केली. त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. यानंतर अभिजीत दिपकेंनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हटलं आहे अभिजीत दिपकेंनी?

सौरव आणि आशुतोष यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलं आहे. ते जंतर-मंतर या ठिकाणी गेले होते तेव्हा त्यांना माहीत होतं की त्यांना अटक केली जाऊ शकते. तरीही ते दोघंही तिथे तिरंगा घेऊन गेले होते, त्यांनी तिरंगा फडकवला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात आपल्या देशात तिरंगा फडकवणं हा देखील कायद्याने गुन्हा झाला आहे. मी नरेंद्र मोदींना हे आव्हान देऊ इच्छितो की हिंमत असेल तर थेट आणीबाणी लावून दाखवा. अशा पद्धतीने कायरपणाचं वर्तन करून, घाबरून, पोलिसांच्या मागे लपून कारवाई करणं बंद करा. या देशात आणीबाणी लावा आणि सांगा देशात आंदोलन चालणार नाही, फक्त हर हर मोदी घर घर मोदीच चालणार. कारण तुम्ही देशातल्या जनतेची, देशाची इथल्या सामान्य माणसांची, संविधानाची कशाचीच इज्जत तुम्ही ठेवत नाही. कुणाबद्दलच तुम्हाला आदर नाही. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर आणीबाणी जाहीर करा. असं म्हणत अभिजीत दिपकेंनी एक व्हिडीओ पोस्ट करत हे आव्हान दिलं आहे.

आशुतोष रांका आणि सौरव दास या दोघांनाही जंतर मंतरवर आंदोलनाचा प्रयत्न केल्याबद्दल आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर अभिजीत दिपकेंनी व्हिडीओ पोस्ट करत थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील ‘जंतर मंतर’ या आंदोलनासाठी बंदी घातलेल्या मैदानात परवानगीशिवाय घुसून घोषणाबाजी करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या संघटनेच्या तीन प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे अशी या तीन नेत्यांची नावे असून, त्यांना आज मंदिर मार्ग येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.