मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक व्यक्ती मृत पावला आहे असं समजून लोकांनी अंत्य संस्कारांची तयारी केली. लोकांनी मृतदेह स्मशानात नेला. जमलेले लोक आणि नातेवाईक मृतदेह चितेवर ठेवणार होते. तेवढ्यात ती व्यक्ती जागी झाली. व्यक्तीला जागं झालेलं पाहून लोकांना धक्का बसला. व्यक्ती मृत नाही हे लक्षात आल्यावर लोकांनी स्मशानात डॉक्टरांना पाचारण केलं. ही घटना मुरैनातील वॉर्ड क्रमांक ४७ मधल्या शांती धाम येथील आहे.
मीडिया रिपोर्ट्समधील माहितीनुसार या व्यक्तीचं नाव जीतू प्रजापती असं असून किडनीशी संबंधित आजाराने तो गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त होता. मंगळवारी त्याची तब्येत बिघडली. या व्यक्तीच्या कुटुंबियांना वाटलं की, त्याचा मृत्यू झाला आहे. काहींनी त्याच्या नाकाजवळ हात नेऊन त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का, तसेच छातीला कान लावून हृदयाचे ठोके सुरू आहेत का ते तपासलं. परंतु ना श्वासोच्छवास सुरू होता ना हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी नातेवाईकांना बोलावलं. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना गोळा करून अंत्ययात्रेची तयारी केली. नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारांसाठी स्मशानात दाखल झाले.




हे ही वाचा >> शिरूर लोकसभेसाठी रस्सीखेच; खासदार अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले…
काही वेळात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. चिता रचण्यात आली होती. परंतु अचानक मृतदेह हलू लागला. असं वाटू लागलं की, तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मृतदेहाची हालचाल पाहून नातेवाईकांनी लगेच डॉक्टरांना स्मशानात पाचारण केलं. डॉक्टरही लगेच शांती धाममधील स्मशानात दाखल झाले. डॉक्टरांनी तिथेच ईसीजी तपासला. त्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीला ग्वाल्हेरच्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. व्यक्ती शुद्धीवर येण्यास थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्याच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असते. जीतू प्रजापतीची स्थिती सध्या गंभीर आहे. त्याच्यावर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.