नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना या वर्षी कमी झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात नमूद केले. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एमसीआरबी) ताज्या अहवालाचा दाखला दिला आहे. गेल्या वर्षी ५९५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर २०२० मध्ये हे प्रमाण ५५७९ इतके आहे असे तोमर यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२०मध्ये देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक २५६७ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ १०७२ कर्नाटक, ५६४ आंध्र प्रदेश, तेलंगण ४६६, मध्य प्रदेश २३५ आणि छत्तीसगढ २२७ असे प्रमाण अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशात ८७, तामिळनाडू ७९, केरळ ५७, आसाम १२ हिमाचल प्रदेश सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. खते न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा प्रकार झालेला नाही असे तोमर यांनी नमूद केले. विशेषत: मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडलेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांनी मदत केल्याचे तोमर यांनी नमूद केले. कृषी हा राज्याचा विषय आहे. मात्र केंद्र सरकार मदतीच्या भूमिकेतून पूरक धोरणे आखत असल्याचे तोमर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decline in farmer suicides across the country zws
First published on: 01-12-2021 at 02:27 IST