केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा श्रीनगर दौऱ्यात दावा

श्रीनगर : काश्मीरचा विशेष दर्जा २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी प्रथमच काश्मीर दौऱ्यावर आले असून त्यांनी सांगितले की, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि दगडफेक यांसारख्या घटना कमी झाल्या आहेत.

  जम्मू-काश्मीर यूथ क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. जे कोणी शांतताभंगाचा किंवा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  शहा म्हणाले की, दहशतवाद कमी झाला आहे, दगडफेकीचे प्रकारही दिसत नाहीत… मला तुम्हाला ग्वाही द्यायची आहे की, जे कोणी शांतताभंग करू  पाहतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही येथील विकासात अडथळा आणू शकत नाही. ही आमची बांधिलकी आहे. 

     शहा यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यास मंजुरी दिली, तो दिवस सोनेरी अक्षरांत लिहिला जाईल. त्यातून दहशतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला. जम्मू-काश्मीरच्या युवकांनी या प्रदेशाच्या विकासात आपले योगदान देणे सुरू ठेवले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे.

शहा यांचा जम्मू-काश्मीरचा तीन दिवसीय दौरा असून, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. पोलीस अधिकारी परवेझ अहमद यांची दहशतवाद्यांनी २२ जून रोजी हत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची शहा यांनी भेट घेतली. तसेच अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत नियुक्तीबाबतची कागदपत्रे सुपूर्र्द केली. नवगाव येथे भेट दिल्यानंतर सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. दहशतवाद्यांकडून परराज्यातील नागरिकांच्या होणाऱ्या हत्यांच्या पाश्र्वाभूमीवर दहशतवाद्यांशी लढण्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठकीत शहा यांना सुरक्षा दलांनी आखलेल्या मोहिमेबाबत तपशील दिला.

सातशे व्यक्तींना तुरुंगात डांबल्याचा मेहबूबा यांचा आरोप

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे किंवा वैद्यकीय महाविद्यालयांचे भूमिपूजन या वरवरच्या उपाययोजनांमुळे मूळ प्रश्न सुटणार नाही, असे मत पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. दिल्लीत जूनमध्ये जी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामध्ये जी आश्वासने देण्यात आली त्याबाबत पावले टाकणे महत्त्वाचे आहे असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. जनतेला भेडसावणाऱ्या  मुद्द्यांचा विचार या दौऱ्यात व्हावा असे मेहबूबांनी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर राज्यात गोंधळाची स्थिती आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वाभूमीवर ७०० जणांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेकांना जम्मू-काश्मीरबाहेर नेण्यात आले, असा आरोप मेहबूबा यांनी केला. त्यामुळे तणावात भर पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.