केंद्र सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमामुळे देशभरात चीनी वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यांना जवळपास १.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. तसेच केवळ धनत्रयोदशीच्या दिवशी किरकोळ व्यापारात ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे देशभरात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस तथा दिल्लीच्या चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले, यंदा दिवाळीची सुरुवात सकारात्मक झाली आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये ‘वोकल फॉर लोकल’चा प्रभाव दिसतो आहे. संपूर्ण बाजारात खरेदीसाठी असलेल्या ९० टक्के वस्तू या भारतीय आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे.
हेही वाचा – पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
पुढे बोलताना, भारतीय वस्तूंच्या विक्रीमुळे चीनच्या व्यापाऱ्यांना फटका बसल्याचेही त्यांनी नमूद केलं. देशात चीनी वस्तूंच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यांना यंदा १.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले. तसेच नागरिकांनी दिवाळीची खरेदी करताना जास्तीत जास्त भारतीय वस्तूंची खरेदी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
हेही वाचा – फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?
याशिवाय ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे (एआयजेजीएफ) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचं सांगितलं. धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सुमारे २० हजार कोटी रुपयांचे सोने आणि २ हजार ५०० कोटी रुपयांची चांदीची विक्री झाली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये जवळपास २ लाख ज्वेलर्स नोंदणीकृत आहेत. त्यांनी आज २५ टन सोने आणि २५० टन चांदीची विक्री केली आहे.