मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला ‘मंडी’मध्ये काँग्रेस विजयी, राज्यात वर्षभरात विधानसभेची निवडणूक

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेल्या मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भाजपला जबरदस्त धक्का दिला. इतकेच नव्हे तर, विधानसभा पोटनिवडणुकीतील तीनही जागांवर राज्यातील सत्ताधारी पक्षाला पराभूत केले. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार असून या पोटनिवडणुकांचे निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी कारगिल लढाईत शौर्य गाजवलेले निवृत्त ब्रिगेडिअर खुशाल चंद ठाकूर यांचा ८७६६ मतांनी पराभव केला. प्रतिभा सिंह यांना ३ लाख ६५ हजार ६५०, तर ठाकूर यांना ३ लाख ५६ हजार ८८४ मते मिळाली. या पोटनिवडणुकीत भाजपने केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांना प्रचारात उतरवले होते. मंडी लोकसभा मतदारसंघात माजी सैनिकांची संख्या मोठी असून लष्करी जवानांचा मुद्दा भाजपने प्रचारात मांडला होता, तरीही भाजपचा पराभव पत्करावा लागला. या लोकसभा मतदारसंघातील १७ विधानसभा मतदारसंघांपैकी ८ भाजपचे गड मानले जातात. २०१९ मध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामस्वरूप शर्मा ४ लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र त्यांच्या निधनामुळे मंडीमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली.

मुख्यमंत्री बदल?

मंडी पोटनिवडणुकीतील पराभवामुळे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना स्वत:च्या मंडी जिल्ह्यावरदेखील पकड ठेवता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागा असून वर्षभराने होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपला नव्या रणनीतीचा अवलंब करावा लागणार आहे. गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रभावहीन ठरलेल्या मुख्यमंत्र्यांना बदलण्यात आले, त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्येही मुख्यमंत्री बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महागाईचा मुद्दा प्रभावी

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जनसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई व बेरोजगारीच्या प्रश्नांवर पोटनिवडणूक लढवली. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातील महागाईच्या प्रचाराला मतदारांनी प्रतिसाद दिल्याने भाजपचा पराभव झाल्याची जाहीर कबुली मुख्यमंत्री ठाकूर यांनी दिली आहे. अर्की, जुब्बल-कोटखाई आणि फतेहपूर या तीन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. हिमाचल प्रदेशात चारही जागांवर भाजपची हार झाल्यामुळे मुख्यमंत्री ठाकूर यांनी, पराभवावर मंथन करू, असे सांगितले. आत्ता काँग्रेसला यश मिळाले असले तरी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक जिंकतीलच असे नव्हे, अशी प्रतिक्रिया देत ठाकूर यांनी स्वत:चा बचाव केला.